पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिली. त्यानंतर लगोलग आलेल्या सुंदर मी होणार, वाऱ्यावरची वरात, असा मी असा मी वगैरे नाटकांनी आणि एकपात्री प्रयोगांनी त्यांना 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' बनवले. रावसाहेबांसारख्या रसिकाला त्यांची मोहिनी पडली नसती तरच नवल. वकिलीच्या कटकटींनी उबलेला जीव पुलंच्या विनोदी शिडकाव्याने पुन्हा टवटवीत होई. आपल्या पुण्यातल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असणारा, मनमुराद हसून दाद देणारा हा प्रेक्षक पुलंच्या चाणाक्ष नजरेत भरल्यावाचून राहणे शक्यच नव्हते. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योगही लौकरच आला. उरळीकांचनचे प्रगतिशील शेतकरी व समाजकार्यकर्ते बापू कांचन हे पुल आणि सुनीताबाई देशपांडे यांचे खूप जवळचे मित्र. योगायोगाने बापू कांचन हे अण्णासाहेब व रावसाहेब शिंदे यांचेही खूप जवळचे मित्र. या समान दुव्यामुळे पुल आणि रावसाहेब एकमेकांचे मित्र बनले, एकमेकांच्या घरी जाणे-येणे सुरू झाले, बघताबघता मैत्री घनिष्ठ झाली. पुढे बाबा आमटे आणि त्यांचे आनंदवन हा दोघांमधला आणखी एक समान दुवा ठरला. पुल हे साहित्यिक विश्वातील रावसाहेबांचे पहिले मित्र ठरले व ही मैत्री पुलंच्या निधनापर्यंत टिकली. रावसाहेबांच्या साठीनिमित्त पाठवलेल्या शुभेच्छापत्रात पुलंनी "कणभर कार्याचा मणभर उदोउदो करण्याच्या जमान्यात मणभर कार्याचा कणभरही उल्लेख न करणाऱ्या रावसाहेबांचा" आपुलकीने गौरव केला आहे आणि त्याचबरोबर "रावसाहेबांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सार्वजनिक कार्यात कसल्याही जाहीर लौकिकाची अपेक्षा न करता शांतपणाने सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतींचाही" आवर्जून गौरव केला आहे. श्रीरामपुरातील महादेव मळा या शिंदे यांच्या निवासस्थानी निवांत मुक्काम करायला पुल व सुनीताबाई दोघांनाही खूप आवडायचे. पुलंचे अनेक रावसाहेबांनी श्रीरामपूर परिसरात आयोजित केले. त्यांतलाच एक म्हणजे डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्या वृक्षगान या पुस्तकाचे - प्रकाशन. ते पुलंनी केले - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींच्या अध्यक्षतेखाली. पुल व सुनीताबाई यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रमही रावसाहेबांनी टिळकनगर येथे आयोजित केला होता. मोठ्या शहरांमधून अशा प्रकारचे साहित्यिक कार्यक्रम जवळपास रोजच कुठेनाकुठे होत असतात व शहरवासी रसिकांना त्यामुळे त्यांचे फारसे अप्रूप असे नसते. पण ग्रामीण भागात असे कार्यक्रम क्वचितच व्हायचे. तिथल्या रसिकांच्या दृष्टीने हे कार्यक्रम म्हणजे पर्वणीच असायची. उपस्थिती खूप असायची आणि प्रतिसादही उदंड मिळायचा. साहित्यशारदेच्या प्रांगणात...