पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्यक्ष परीक्षा दोन दिवसांत संपली. सर्व पेपर्स उत्तम गेले. तशात 'अस्वलास वेसण खाशी, घालून फिरे दरवेशी' ही त्यांची आवडती व तोंडपाठ असलेली कविता व तिच्यावरील प्रश्न परीक्षेत आल्यामुळे रावसाहेबांचा आत्मविश्वास वाढला होता. पण बापलेक दोघेही पाडळीला परतल्यानंतरही दादांचा संताप आणि चडफडाट मात्र कायम होता. शाळा आणि रोजचा दिनक्रम नेहमीसारखा पुन्हा सुरू झाला. आपल्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार याविषयी तोरकडी मास्तरांना शंभर टक्के खात्री होती. खुद्द रावसाहेबांच्या मनात मात्र स्कॉलरशिप मिळेल वा न मिळेल हा विचारही नव्हता; आपण पेपर्स उत्तम लिहू शकलो यातच त्यांना समाधान होते. आज मागे वळून या अनुभवाकडे पाहताना रावसाहेब म्हणतात : कष्ट, "हल्ली शिक्षण हे केवळ परीक्षार्थी आणि पुस्तकी झालेलं आहे. अपेक्षित प्रश्न आणि उत्तरं यांच्याभोवतीच शिक्षण फिरत आहे. खेळ, व्यायाम, वाचन, व्यासंग, आत्मविश्वास, माणुसकी, कर्तव्य, सद्विवेक आणि चारित्र्य यांची जोपासना शिक्षणातून हद्दपारच झाली आहे. मला त्या परीक्षेचं कोणतंच दडपण वाटलं नव्हतं याचं कारण काय असावं याचा विचार आज मी करतो तेव्हा लक्षात येतं, की परीक्षा हा आमच्या शिक्षणाचा केवळ एक भाग होता; ते शिक्षणाचं सारसर्वस्व नव्हतं. शिक्षण म्हणजे इतरही बरंच काहीतरी आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञानार्जन आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास हीच शिक्षणाची दिशा आहे अशी आमची धारणा होती. ' }} थोड्याच दिवसांत पाचवीची वार्षिक परीक्षा झाली. नेहमीप्रमाणे रावसाहेबांचा पहिला नंबर आला होता. उन्हाळ्याची सुट्टी पाडळीच्या घरात मजेत गेली. ती संपल्यावर ते देवठाणला परतले. सहावीचा रीतसर वर्ग सुरू झाला. थोड्याच दिवसांत मुख्याध्यापक बडवे मास्तर यांना शिक्षणखात्याकडून एक पत्र आले. स्कॉलरशिपच्या परीक्षेत रावसाहेबांचा संपूर्ण जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला होता! ही बातमी त्यांनी ताबडतोब रावसाहेबांच्या घरी कळवली. दादांना मुलाचा खूप अभिमान वाटला. लगेचच त्यांनी शाळेत धाव घेतली. दादांचे शाळेत स्वागत करताना मुख्याध्यापकांनी रावसाहेबांचे खूप कौतुक केले. दादांचेही डोळे भरून आले होते. तोरकडी मास्तरांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या शिष्याने सार्थ ठरवला होता. देवठाणच्या शाळेत तर त्यांनी पेढे वाटलेच पण शिवाय ते ताबडतोब सायकलवरून अकोल्याला गेले. तिथल्या तालुका शाळेतल्या, पूर्वी त्यांना हिणवणाया, शिक्षकांनाही त्यांनी अगदी ताठ मानेने पेढे वाटले. परगावच्या शाळेत ३७