पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कायदे, पाठ्यपुस्तके असा प्रवास सुरू झाला. ज्याला आपण आज साहित्य म्हणतो अशा प्रकारची पुस्तके ( कथा, कविता, कादंबऱ्या, चरित्रे, प्रवासवर्णने, निबंध, समाजशास्त्रीय लेखन, समीक्षा इत्यादी) विसावे शतक सुरू झाले त्याच सुमारास प्रथम व्यापक प्रमाणात उपलब्ध होऊ लागली. त्यापूर्वीही काही अगदी तुरळक साहित्यिक पुस्तके उपलब्ध होत होती, पण ती केवळ अपवादस्वरूप असत. ज्याला आपण मौखिक परंपरा असे गोंडस नाव देतो तो प्रकार खरेतर तंत्रज्ञानाच्या भयानक अभावातून निर्माण झालेला प्रकार होता; अन्य कुठल्या पर्यायाच्या अनुपस्थितीत केलेली ती तडजोड होती. पुस्तकांचा तुटवडा ग्रामीण भागात तर अधिकच होता. त्या परिस्थितीत वाचनसंस्कृती हा शब्दच निरर्थक होता. आपल्या लहानपणी पाडळीतल्या घरी दोन-चार पोथ्या, दोन-चार बाळबोध गोष्टींची पुस्तके यापलीकडे वाचनासाठी रावसाहेबांना फारसे काही साहित्य उपलब्धच नव्हते. इतर घरांमधली परिस्थितीही वेगळी नव्हती. वाचनालय हा प्रकार तर कोणाच्या ऐकिवातही नव्हता. वयाच्या बाराव्या वर्षी ते जेव्हा नाशिकच्या शाळेत दाखल झाले आणि तिथल्या सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य बनले त्याचवेळी रावसाहेबांचा पुस्तकांच्या जगाशी खऱ्या अर्थाने परिचय झाला असे म्हणता येईल. या सुरुवातीच्या काळातच वाचनाची गोडी त्यांना लागली आणि साहित्य व साहित्यिक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनून गेला. साहित्यशारदेच्या प्रांगणात त्यांच्या भावी आयुष्यातले अगणित तास निरतिशय आनंदात गेले आहेत आणि आनंदाबरोबरच जगण्यासाठीची एक अदम्य ऊर्जाही त्यांना साहित्यातून मिळत गेली आहे. वाचन हा साहित्यप्रेमाचा पहिला आविष्कार हे उघडच आहे. पण साहित्यिकांच्या प्रत्यक्ष सहवासात वावरणे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत वेगवेगळे साहित्यिक उपक्रम करणे हाही काही जणांच्या बाबतीत साहित्यप्रेमाचाच एक आविष्कार असतो. रावसाहेबांच्या बाबतीत हे मोठ्या प्रमाणावर घडत गेले आणि त्याची सुरुवात पुलंबरोबरच्या मैत्रीने झाली. वकिलीच्या सुरुवातीच्या काळात साहजिकच साहित्यिकांच्या सहवासासाठी फारसा वेळ देता येत नसे, पण कोर्टाच्या कामानिमित्त पुण्याला वरचेवर यावे लागे व अशावेळी पुण्यात कुठे पु. ल. देशपांडे यांचा कार्यक्रम असला, तर रावसाहे तो सहसा कधी चुकवत नसत. पु. ल. त्यावेळी ऐन भरात होते. तुझे आहे तुजपाशी त्यांनी १९५७ साली लिहिले. 'बटाट्याची चाळ'चा पहिला एकपात्री प्रयोग १९६० सालचा. या दोन्ही कलाकृतींनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून अजुनी चालतोची वाट... ३७८