पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ साहित्यशारदेच्या प्रांगणात योहानस गुटेनबर्ग याने १४५५ साली जर्मनीमध्ये प्रथम मुद्रणयंत्राचा शोध लावला. बायबल हे त्याने छापलेले पहिले पुस्तक. त्यापाठोपाठ अनेक पुस्तके छापली जाऊ लागली. मुद्रणतंत्रात झपाट्याने सुधारणा होत गेली आणि बघताबघता सहस्रावधी पुस्तके लोकांमध्ये वितरित होऊ लागली. भूर्जपत्रावरील पारंपरिक लेखनाप्रमाणे या पुस्तकांना प्रतींची मर्यादा नव्हती. त्यामुळे मागील हजार-दोन हजार वर्षे मूठभरापर्यंत सीमित असलेले ज्ञान लक्षावधी, कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवण्याचा पुस्तके हा सर्वाधिक सुलभ मार्ग ठरला. ज्ञानाचे बहुजनीकरण (मासिफिकेशन ऑफ नॉलेज) त्यामुळे मानवी इतिहासात प्रथमच शक्य झाले. त्याआधी ज्ञानप्रसाराला, जागतिक पातळीवर विचार केला, तर कुठल्याही जातिभेदाची वगैरे मर्यादा नव्हती; खरा प्रश्न होता तो उचित तंत्रज्ञानाच्या अभावाचा. ते तंत्रज्ञान उपलब्ध होताच ज्ञानही सर्वदूर पसरू लागले. मुद्रण तंत्रज्ञानामुळे ज्ञान प्रसाराचा रेटाच इतका जबरदस्त वाढला, की त्या रेट्याला रोखायचे सामर्थ्य धर्मजातिभेदांसारख्या कुठल्याच मानवनिर्मित भिंतींमध्ये नव्हते. नवनिर्मित ज्ञान पुस्तकाच्या रूपाने संग्रहितही होऊ लागले व त्याचवेळी सर्व समाजापर्यंत पोचूही लागले. समाजाच्या सर्वच स्तरांतील माणसे ज्ञानात भर घालू लागली. त्या प्रसारातून पुन्हा नवज्ञाननिर्मितीला अधिकच चालना मिळाली. त्या ज्ञानप्रसाराबरोबरच एकूण प्रगतीचा वेगही अनेक पटींनी वाढला. मुद्रणाचा शोध हा म्हणूनच मानवी इतिहासातील एक क्रांतिकारक शोध मानला जातो. दुर्दैवाने आपला देश त्यावेळी इतका मागे पडला होता, की हे मुद्रण तंत्रज्ञान आपल्यापर्यंत व्यापक प्रमाणात येण्यासाठी तीन-चारशे वर्षे जावी लागली. तेही तंत्रज्ञान आपल्या देशात आणले ते पाश्चात्त्यांनीच. सुरुवातीला फक्त बायबल व इतर धार्मिक पुस्तके छापली गेली. मग हळूहळू व्याकरण, सरकारी कामकाज, साहित्यशारदेच्या प्रांगणात... ,