पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शकेल का, त्यासाठी आवश्यक ते समाजीकरण आपल्या देशात झाले आहे का, का आजही आपण भिन्न-भिन्न व्यक्तींचा व केवळ भौगोलिक सलगता ह्या एकमेव दुव्याने बांधला गेलेला एक प्रचंड पण एकमय नसलेला असा समुदाय आहोत – हे सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत. - स्वतःसाठी केवळ पोटापुरतेच कमावणारे पण तरीही रावसाहेबांचे जीवन घडवणारे श्रीधरमास्तर आणि तोरकडीमास्तर, ताडेसर आणि पुरोहितसर आज का दिसत नाहीत? सारवलेली जमीन, छडीने मारणारे आणि कान पिळणारे गुरुजी, हातात फक्त पाटी-पेन्सिल एवढेच असणाऱ्या त्यावेळच्या ओक्या-बोक्या शाळेत जायला मुले तेव्हा आसुसलेली असायची. आज मात्र सर्व सुविधांनी युक्त आणि फुकट जेवण देणाऱ्या शाळेत जायलाही मुले कुरकुर का करतात? आणि शिक्षणविषयक हजारो सेमिनार्स भरवूनही आणि गुदामे ओसंडून वाहतील एवढे विद्वज्जड प्रबंध लिहिले जाऊनही शिक्षणाचा दर्जा एवढा खालावलेला का? ते शिक्षण प्रत्यक्ष जीवनापासून इतके तुटलेले का ? चारित्र्यसंपन्न नागरिक घडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असे फारसे काही आमच्या तथाकथित ज्ञानमंदिरांमध्ये का आढळत नाही ? त्या दिवशी रावसाहेबांशी बोलताना असे अनेक प्रश्न मनात उद्भवले एवढे खरे आणि हे प्रश्न रयत शिक्षण संस्थेच्या किंवा एकूण शिक्षणक्षेत्राच्या खूप पलीकडे जाणारे प्रश्न आहेत. रावसाहेबांच्या मनातील खरी खंत आणि त्यांचे खरे असमाधान याच प्रश्रांमध्ये प्रतिबिंबित झाले आहे. अजुनी चालतोची वाट... ३७६