पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तीन वेळा कपाळावर आपटून घेऊन कर्मवीर म्हणाले, 'अहो, काय केलंत हे! आपल्या सगळ्या शिक्षणाचं वाट्टोळं करणारा हा निर्णय आहे! स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः पुढाकार घेऊन काही करायची लोकांची ऊर्मीच यामुळे नष्ट होईल. प्रत्येक गोष्टीसाठी लोक सरकारवरच अवलंबून राहू लागतील. समाज आळशी बनेल. जे फुकट मिळतं त्याची कोणालाच काही कदर असत नाही; फुकट दिलंत तर तुमचं शिक्षणही कवडीमोल ठरेल. अतिशय दुर्दैवी असा हा तुमचा निर्णय आहे. मुलांनी स्वावलंबी बनावं, कमवावं व शिकावं हेच उत्तम.' कर्मवीरांनी तेव्हा हे जे कळवळून सांगितलं ते मला आजही पटतं. लोकांनी स्वतःच्या पुढाकारातून जर शाळा उभारल्या असत्या आणि चालवल्या असत्या तर आज जी शिक्षणाची दुरवस्था झाली आहे ती झाली नसती. " रावसाहेबांच्या तोंडून हा प्रसंग प्रस्तुत लेखकाने दोन - तीनदा तरी ऐकला आहे आणि ही त्यांची प्रामाणिक आणि खूप विचारपूर्वक बनवलेली भूमिका आहे यात शंका नाही. पण ही त्यांची भूमिका जर ग्राह्य मानली तर गेल्या पाच-सहा दशकांत आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेला प्रवास हा मूलतः चुकीच्या दिशेने केलेला प्रवास ठरणार आहे. लोकांनी स्वतःचे प्रश्न मिटवण्यापेक्षा सरकारने लोकांचे सगळे प्रश्न मिटवावेत याच दिशेने गेली पन्नास-साठ वर्षे आपला प्रवास सुरू आहे. शिवाय हे फक्त शिक्षणक्षेत्रापुरतेच घडलेले नाही; उद्योगधंद्यांपासून रोजगारनिर्मितीपर्यंत, आरोग्यापासून संस्कृतिसंवर्धनापर्यंत, चित्रपटांना अनुदान देण्यापासून साहित्यसंमेलने भरवण्यापर्यंत, अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपण्यापासून पोलिओ निर्मूलनापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यापासून गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आज सरकारचा सर्वाधिक सहभाग आहे, निर्णायक हस्तक्षेप आहे; प्रत्येक गोष्टीसाठी आज जनता सरकारवर अवलंबून राहू लागली व्यक्तिगत जबाबदारी आणि कर्तव्यभावना, लोकांनी स्वतःच्या प्रयत्नांतून अथवा एकत्र येऊन आपले वा गावाचे प्रश्न सोडवायची वृत्ती झपाट्याने क्षीण होत आहे. हे असेच चालत राहिले तर प्रत्येक बाबतीत आपण सरकारवरच अवलंबून राहत जाऊ; स्वातंत्र्य या शब्दालाच मग फारसा अर्थ उरणार नाही. पूर्वी इंग्रजांचे आश्रित होतो, आता आजच्या सरकारचे आश्रित बनू; एवढाच काय तो फरक उरेल. या सर्व परिस्थितीवर नेमके उत्तर काय, विकसनशील देशात हे सर्व सरकारने केले नाही तर दुसरे कोण करू शकेल, लोकपुढाकार वा लोकसहभाग हा आपल्याकडे पुरेशा व्यापक प्रमाणात उपलब्ध होईल का, हजार वर्षे गुलामगिरीत काढलेल्या या देशातील जनतेत आपले प्रश्न आपण सोडण्याइतकी प्रगल्भता येऊ कर्मवीरांच्या वाटेने ...