पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काम करत राहायचे; आणि आपल्याला ते केल्याचा अभिमान वाटेल इतक्या चांगल्या प्रकारे ते करायचे; त्यातच जीवनाची सार्थकता मानायची अशा प्रकारची एक प्रवृत्ती त्यातून पाश्चात्त्यांमध्ये रुजली व त्यातूनच पुढे त्यांची आजची कार्यसंस्कृती विकसित झाली. त्यांच्या प्रगतीचे ते एक मोठे कारण आहे. - दुर्दैवाने आपल्या संस्कृतीने श्रमांना ही प्रतिष्ठा कधीच दिली नाही. आपल्या समाजाने श्रमणारे जीव शूद्र मानले; त्यांना व व्यापार करणाऱ्यांना (ज्यातही श्रम भरपूर लागतात) वैश्यांना खालचे स्थान दिले, तर राज्यकर्ते व विद्वान यांना क्षत्रिय व ब्राह्मण यांना - उच्चासनी बसवले. अंगमेहनतीचे कुठलेही काम करायला जेव्हा आमचा तरुण नकार देतो, त्यामुळे 'आपली पोझिशन डाउन होते' असे मनोमन मानतो, तेव्हा त्यामागे शेकडो वर्षे चालत आलेल्या एका दुर्दैवी रूढींचा प्रभाव असतो. शेतकऱ्याचा मुलगाही मग शहराकडे धाव घेतो, त्याला पंख्याखाली बसून करायचे साहेबी कामच हवे असते; मातीत हात घालायचे नसतात. मेंदू आणि हात यांच्यातील ही फारकत दूर करायचे, श्रमांना प्रतिष्ठा द्यायचे प्रयत्न आपल्याकडे झाले नाहीत असे नाही. असे प्रयत्न ज्यांनी आयुष्यभर केले त्यांच्यातले एक प्रमुख म्हणजे महात्मा गांधी. त्यांचा चरखा आणि रोजची सूतकताई हादेखील श्रमसंस्काराचाच एक भाग होता. स्वतःच्या हातांनी काम करण्याचे आध्यात्मिक महत्त्वही गांधीजींनी अधोरेखित केले. स्वातंत्र्य आंदोलनातील एक प्रसंग या संदर्भात खूप बोलका आहे. काँग्रेसनेत्यांची कुठल्यातरी महत्त्वाच्या विषयावर गांधीजींच्या आश्रमात चर्चा चालली होती. मध्येच गांधीजींनी घड्याळाकडे पाहिले आणि ते उठले, खोलीच्या बाहेर गेले. चर्चा मध्येच थांबल्यामुळे चकित होऊन सगळे नेते गांधीजींकडे पाहतच राहिले. जरा वेळाने गांधीजी परतले. आपल्या जागी जाऊन बसले. "बापू, मघाशी आपली इतकी महत्त्वाची चर्चा चालू असताना मध्येच उठून तुम्ही बाहेर कुठे गेला होता ?" कुणीतरी कुतूहलाने विचारले. "मी माझ्या शेळीला चारा देऊन आलो. तिची खायची वेळ झाली होती, " गांधीजी उत्तरले. "पण आता? आपली इतकी महत्त्वाची चर्चा चालू असताना ? " पुढचा प्रश्न आला. "आपली चर्चा महत्त्वाची आहेच, पण शेळीला वेळच्या वेळी चारा देणंही तितकंच महत्त्वाचं आहे," असे म्हणत गांधीजींनी पुन्हा चर्चा सुरू केली. आंदोलन व त्याची बौद्धिक चर्चा यांच्याइतकेच महत्त्व साध्यासुध्या शारीरिक कामांना आहे, कुठल्याच कामाला आपण कमी लेखू नये, हा एक महत्त्वाचा संदेश गांधीजींनी एका साध्या कृतीतून दिला. गांधीजींचा हा श्रमसंस्कृतीचा वारसा कर्मवीरांनी आयुष्यभर मोठ्या जिद्दीने कर्मवीरांच्या वाटेने ... ३७३