पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही मुले खूप शिकली नसतील, पण समाजाची एक मूलभूत गरज ती भागवत होती. सहकारी चळवळीसाठी पायाभूत ठरले असेच हे रयतचे योगदान होते. डॉ. र. बा. मंचरकर यांनी म्हटल्याप्रमाणे, "समर्पणवृत्तीने काम करणारे कार्यकर्ते आणि सेवक, संस्थेत शिक्षण घेणाऱ्या सर्व जातिधर्मांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींची प्रचंड संख्या आणि भाऊरावीय तत्त्वांचे अनुसरण करण्यासाठी तळमळ ही रयत शिक्षण संस्थेची वैशिष्ट्ये आजही काही प्रमाणात कायम आहेत. त्यामुळे आजच्या सार्वत्रिक मूल्य-उद्ध्वस्ततेच्या काळात आणि शिक्षणाचा बाजार मांडून बसलेल्या संस्थांच्या मेळाव्यात रयत शिक्षण संस्थेकडे श्रद्धेने, आशेने आणि अपेक्षेने पाहावे, अशीच स्थिती आहे. " (प्रस्तावना, शिक्षण आणि समाज, पृष्ठ २३) रयत ही एक शैक्षणिक संस्था आहे आणि त्या दृष्टीने विचार करता तिचे योगदान जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देणे हे असणार हे उघड आहे. पण त्याचबरोबर रयत ही एक सामाजिक परिवर्तनाची शक्तीदेखील आहे. किंबहुना कर्मवीरांच्या लेखी शिक्षण महत्त्वाचे होते कारण त्याद्वारे समाजपरिवर्तन होऊ शकते. 'कलेसाठी कला' या भूमिकेप्रमाणे केवळ 'शिक्षणासाठी शिक्षण' ही कर्मवीरांची भूमिका कधीच नव्हती. त्यांना शिक्षण हवे होते ते सामाजिक परिवर्तनासाठी, केवळ पदवीच्या कागदासाठी नव्हे. म्हणूनच समाजात श्रमसंस्कार रुजवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रस्तुत लेखकाला त्यांच्या निखळ शैक्षणिक कार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे वाटतात. श्रमसंस्कृतीचा या देशात कमालीचा अभाव आहे आणि ती रुजवण्यासाठी रयतने काही पद्धतशीर प्रयत्न केले, तर रयतने या देशाला दिलेले ते सर्वांत मोठे आणि आगळेवेगळे योगदान असेल. त्या संदर्भात इथे काही विचार मांडावेसे वाटतात. पाश्चात्त्यांच्या विकासाची कारणे अनेक असणार, पण ह्यांतील एक महत्त्वाचे कारण त्यांची श्रमसंस्कृती (वर्क कल्चर) हे आहे. औद्योगिक क्रांती ज्या युरोपियन देशांत सर्वप्रथम घडून आली ते ब्रिटन हॉलंड- जर्मनी - फ्रान्स - स्वीडन यांसारखे देश हे प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मातल्या प्रोटेस्टंट पंथाचे आहेत ही वस्तुस्थिती विचारात घेण्यासारखी आहे. वर्क एथिक्स (कामातली नैतिकता) हे ख्रिश्चनांपैकी प्रोटेस्टंटांचे मोठे बलस्थान होते. 'Work is worship and duty is God' ('काम ही पूजा आणि कर्तव्य हा देव') ही केल्व्हिन या त्यांच्या मोठ्या धर्मगुरूची शिकवण. कुठलेही काम कमी लेखायचे नाही; चिकाटीने, कर्तव्यभावनेने आपापले अजुनी चालतोची वाट... ३७२