पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहोत." पण तोरकडी मास्तर अगदी जिद्दीला पेटले होते. त्यांच्या देखरेखीखाली मग रावसाहेबांनीही खूप नेटाने अभ्यास सुरू केला. स्कॉलरशिपसाठी वेगळा काही क्रमिक अभ्यास नव्हताच; मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावरच मुख्य भर होता. शेवटी एकदाचा स्कॉलरशिप परीक्षेचा दिवस जाहीर झाला. परीक्षा केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे अहमदनगरला, सोसायटी हायस्कूलमध्ये होते. तिथे जाण्यासाठीही बरीच तयारी करावी लागली. जाऊन येऊन पुरत्या चार दिवसांचा प्रवास होता तो. प्रवासासाठी जेवणाचे गाठोडे बांधून घ्यावे लागले. पाडळी ते संगमनेर हे २० मैल अंतर घोडीवर बसून व मग पुढे नगरपर्यंत बस असा सगळा प्रवास. सोबत म्हणून रावसाहेबांबरोबर त्यांचे वडील ऊर्फ दादा आले. वडलांची तब्येत तेव्हा बरी नव्हती, अंगात ताप होता. पण तरीही मुलासाठी म्हणून ते आले. भाडेखर्चासाठीदेखील त्यांना बरीच लटपट खटपट करावी लागली होती. अहमदनगरला राहायचे कोठे हाही एक मोठाच प्रश्न होता. संगमनेरचे केशवराव दादा देशमुख वकील (त्यांना के. बी. दादा म्हणत) हे काँग्रेसचे एक पुढारी आणि जिल्हा लोकल बोर्डाचे प्रेसिडेंट थोडेफार परिचित होते. त्यांचे अहमदनगरला एक घर होते. त्या घराला बाहेरून असलेल्या जिन्याखाली या दोघांची राहण्याची कशीबशी सोय झाली. दादांसारख्या मानी माणसाला हे सगळे फार अवघडच होते. नेहमी इतरांचे आपल्या घरी उत्तम आदरातिथ्य करणाऱ्या त्यांच्यासारख्या घरंदाज गृहस्थावर आज दुसऱ्या कोणाच्या घरी व तेही बाहेरच्या जिन्याखाली असा आसरा घ्यायची पाळी आली होती. सकाळी दोघे बापलेक परीक्षा केंद्रावर गेले; पण परीक्षेचे नंबर दुपारी लागणार असे कळल्याने त्यांना परतावे लागले. दुपारी तीन- चारच्या सुमारास दोघे परत र्गावर गेले. तिथे इतर परीक्षार्थी मुलांची झुंबडच उडाली होती. सगळीच शहरातली दिसत होती. वागण्याबोलण्यात चलाख, अंगावर झकपक कपडे. अनेकांचे पालकही बरोबर होते. तेही तसेच सुशिक्षित दिसत होते. हे सगळे पाहून दादा चांगलेच हबकले. या सगळ्यांसमोर आपल्या मुलाचा मुळीच टिकाव लागणार नाही, त्याला स्कॉलरशिप मिळणे केवळ अशक्य आहे, त्याने उगाचच आपल्याला या सगळ्या खर्चात आणि खटाटोपात टाकले असे सारखे त्यांच्या मनात येऊ लागले आणि त्यामुळे पुन:पुन्हा ते आपल्या मुलाला रागावू लागले. त्यांचा पारा चांगलाच चढला होता. आधीच ते तापामुळे बेजार झाले होते. वडलांचा वैताग रावसाहेबांना समजत होता, पण त्यांनी एका शब्दानेही वडलांचा प्रतिवाद केला नाही. परीक्षेचा नंबर आणि प्रत्यक्ष बसायचा बाक पाहून दोघे मुक्कामी परतले. अजुनी चालतोची वाट... ३६