पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाचत असतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी, शिक्षणाचा केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक विस्तार करण्यासाठी रयतला भविष्यात शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. या संदर्भात विज्ञान प्रसाराला रावसाहेबांनी रयतमध्ये दिलेली चालना महत्त्वाची आहे. १७ एप्रिल २०१४ तारखेच्या आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या एका आढाव्यात रावसाहेब लिहितात : "चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही कालावधीतच मला भाभा विज्ञान केंद्राचे मा. नरेंद्र देशमुख यांचा फोन आला. त्यांच्या विज्ञान केंद्राच्या वतीने ते रयत शिक्षण संस्थेमधील शास्त्र शाखेच्या माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग घेऊ इच्छित होते. हे प्रशिक्षण वर्ग ते पूर्णतया त्यांच्या खर्चानेच घेणार होते. शास्त्रशाखेतील शिक्षकांना अधिक परिपूर्ण आणि प्रत्यक्षात त्यांना न मिळालेले असे शिक्षण ते त्यांना देऊ इच्छित होते. माझी संमती त्यांनी विचारली. माझ्या आनंदाला तर पारावार उरला नाही. लगेच त्यांना होकार दिला. आमचे सचिव, सहसचिव यांनाही ती कल्पना खूपच उपयुक्त वाटली. सन २००८ ते सन २०१२ या चार वर्षांत हजाराच्या वर शास्त्र शाखेचे शिक्षक हे प्रशिक्षण घेऊन तयार झाले. या सर्वांची फलप्राप्ती अशी झाली, की सन २०१३च्या एप्रिल महिन्यात भाभा विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार रयतच्या या प्रशिक्षित शिक्षकांत आघाडीवर असलेल्या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षक व विद्यार्थी यांच्या पातळीवर एक सायन्स काँग्रेस एप्रिल २०१३मध्ये घेतली. या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नामदार शरदराव पवार आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची उपस्थिती लाभली. शेकडो विद्यार्थ्यांनी शास्त्रीय खेळणी आणि उपकरणे बनविलेली होती. त्यांचे भव्य प्रदर्शन या सोहळ्यात भरविण्यात आले. हजारोंनी ते प्रदर्शन पाहिले. भाभा विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणाचे हे फलित होते. भाभा विज्ञान केंद्राच्याच रयत शिक्षण संस्थेने उल्लेखनीय असा दुसरा टप्पा गाठला. " उपरोक्त सायन्स काँग्रेससारखीच एक तीन दिवसांची सायन्स काँग्रेस रयततर्फे फेब्रुवारी २०१४ मध्येही श्रीरामपूर येथे घेण्यात आली. मा. अरुणराव कडू, प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य लक्ष्मण भोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. काँग्रेसच्या पूर्वतयारीसाठी म्हणून ठिकठिकाणी ३९ कार्यशाळा घेण्यात आल्या. 'ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी' हे या सायन्स काँग्रेसचे घोषवाक्य होते. रोज पंधरा ते वीस हजार विद्यार्थी परिषदेला हजेरी लावत होते. 'जडण- घडण' मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांची या उपक्रमात बरीच मदत झाली. आता दरवर्षी अशी सायन्स काँग्रेस भरवण्याचे ठरले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या दृष्टीने हा एक उत्तम उपक्रम आहे. २०१४ अजुनी चालतोची वाट... ३६८