पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषण ऐकण्यासाठी बसून राहावे.' त्यांच्या या घोषणेने प्राचार्यांसहित संयोजकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची काळजी दिसली. पारितोषिक घेतल्यानंतर विद्यार्थी भाषण ऐकतील किंवा नाही, याची प्राचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री वाटत नव्हती असे दिसले. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांनी पारितोषिके स्वीकारली. सर्व विद्यार्थी रावसाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिस्तबद्धरीत्या सभागृहात बसून राहिले. माझे भाषण सुरू झाले. सर्व विद्यार्थी शांतपणे माझे भाषण ऐकत होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत दिसणाऱ्या बेशिस्त व बेदरकार वृत्तीचा या ठिकाणी लवलेशही दिसला नाही. माझ्या भाषणानंतर रावसाहेबांचे अध्यक्षीय भाषण झाले. शेवटी रावसाहेबांचे औदार्य दिसले, ते त्यांच्या भाषणाच्या शेवटच्या चरणात. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सभागृहात शांत बसल्याबद्दल त्यांचे उदारपणे आभारही मानले. त्यांनी विद्यार्थ्याचे आभार ज्या शब्दांत मानले ते औदार्य विरळच!" ( प्रेरणापर्व, पृष्ठ ५६ - ७) रयतपुढे असलेले तिसरे आव्हान संस्थेच्या आधुनिकीकरणाचे आहे. रयतच्या अनेक शाळा आजही अगदी कच्च्या इमारतींमध्ये भरतात. क्रीडांगण, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्टाफ रूम अशा अगदी प्राथमिक सुविधाही तिथे नाहीत. अनेक शाळांमध्ये शौचालयांचीही धड सोय नाही. पन्नास-पाउणशे वर्षांपूर्वी हे सारे खपून जाणारे होते, पण आजच्या काळाशी हे अगदीच विसंगत आहे. शाळांचे दर्शनी रूपदेखील रयतसारख्या प्रस्थापित संस्थेच्या लौकिकाला शोभणारे हवे. मुलांना विद्यार्जनासाठी उल्हास वाटेल, मन प्रसन्न राहील असे वातावरण प्रत्येक शाळेत असायला हवे. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे अवघड नाही. एकेकाळी रयतमधून लेल्या आणि आज समाजात उच्चपदस्थ असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही लाखांमध्ये असेल. ज्या शाळेने आपला पाया घातला, आपल्याला घडवले, आपल्याला भविष्यात चांगले दिवस दाखवले त्या शाळेसाठी प्रत्येकी हजार, दोन हजार रुपये द्यायला माजी विद्यार्थी का तयार होणार नाहीत ? बहुधा हा आर्थिक शक्याशक्यतेपेक्षा उचित मानसिकतेचा प्रश्न आहे. गरज आहे ती आधुनिकतेचे महत्त्व पटण्याची; नवे काही करण्यासाठी पुढाकार घेऊन धाडसाने एक व्यापक व दीर्घकालीन नियोजन करण्याची. कर्मवीरांनी घडवलेली रयत ही ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रात जी परिस्थिती होती त्यावर आधारित होती. रयतचे ते प्रारूप (मॉडेल) आजच्या काळासाठी उपयुक्त ठरेल का याचा रयतच्या नेतृत्वाने प्रामाणिकपणे व मोकळ्या कर्मवीरांच्या वाटेने...