पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिक्षणतज्ज्ञांना या प्रश्नाच्या गांभीर्याची जाणीव झाली आहे. भारत सरकारनेही चार-पाच वर्षांपूर्वी याच जाणिवेतून नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही आस्थापना सुरू केली आहे व तिच्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीही उपलब्ध करून दिला आहे. रयत शिक्षण संस्थेतील एक प्राचार्य डॉ. अरुण दशरथ आंधळे यांच्याकडून अगदी अलीकडेच प्राप्त झालेली काही माहिती या संदर्भात उद्बोधक आहे. पुण्याजवळच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे ते सध्या प्राचार्य आहेत. गेली सात वर्षे कौशल्याधिष्ठित शॉर्टटर्म कोर्सेस हा एक अभिनव उपक्रम या महाविद्यालयात राबवला जात आहे. सध्या असे तीस वेगवेगळे कोर्सेस महाविद्यालयात घेतले जातात. त्यांमध्ये फॅशन डिझायनिंग, ब्यूटी पार्लर, विद्युत उपकरणांची दुरुस्ती, इन्श्युरन्स, टॅक्सेशन, पत्रकारिता, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, डीटीपी इत्यादी व्यवसायाभिमुख कौशल्यांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थी दरवर्षी या तिसांपैकी एक कोर्स करतो; म्हणजेच तीन वर्षांच्या महाविद्यालयीन शिक्षणकाळात प्रत्येक विद्यार्थ्याचे असे तीन कोर्सेस करून होतात. महाविद्यालयातून पदवीधारक बनलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या कोर्सेसचा उपयोग करून स्वतःचे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत व त्यांत उत्तम यशही संपादन केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोकरीचा पर्याय स्वीकारला त्यांनाही नोकरी मिळवताना व पुढे ती करताना या कोर्सेसमध्ये मिळालेल्या कौशल्याचा फायदा मिळत आहे. गेल्या सात वर्षांत या कोर्सेसमुळे महाविद्यालयालाही जवळजवळ दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरवर्षी या महाविद्यालयातील ३००० विद्यार्थी या उपक्रमाचा फायदा घेत आहेत. विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण आणि समाजाच्या गरजा यांची सांगड घालणारा हा पथदर्शी उपक्रम सर्वच शिक्षणसंस्थांनी प्राधान्यपूर्वक अमलात आणायला हवा. महात्मा गांधींच्या नावाने एक विद्यापीठ काढण्याची कर्मवीर भाऊराव पाटील यांची फार इच्छा होती; त्यांनी तसा संकल्प १९४८ मध्येच जाहीरही केला होता. त्यांच्या नावाने अशा स्वरूपाचे कौशल्यविकसन करणारे, त्यासाठी प्रशिक्षक तयार करणारे एखादे विद्यापीठ रयतने काढले तर? संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीने ते एक अत्यंत कालोचित, महत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे रयतच्या एकूण पिंडप्रकृतीशी • सुसंगत असे पाऊल ठरू शकेल. रयतपुढे असलेले दुसरे आव्हान संगणकशिक्षणाचे आहे. ऐतिहासिक काळातील तथाकथित उच्चवर्णीय व कनिष्ठवर्णीय किंवा श्रीमंत आणि गरीब या भेदांपेक्षा अजुनी चालतोची वाट... ३६२