पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हवा. टाटा बिझिनेस सपोर्ट सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड ही हैद्राबाद येथे असलेली टाटा ग्रुपची एक कंपनी हे सेंटर चालवत आहे. त्यासाठी आवश्यक ती सुमारे बारा हजार चौरस फूट जागा व उच्च दाबाने वीज पुरवण्याची सोय प्राचार्य म्हस्के यांनी आपल्या बोरावके महाविद्यालयात उपलब्ध करून दिली. या सगळ्यात बऱ्याच अडचणी आल्या आणि खूप वेळही गेला. शेवटी १७ सप्टेंबर २०११ रोजी हे सेंटर कार्यान्वित झाले. याचे स्वरूप मुख्यतः कॉल सेंटरचे आहे आणि 'टाटा स्काय' व 'टाटा मोटर्स' या दोन कंपन्यांच्या ग्राहकांना इथून सर्व्हिस दिली जाते. एकूण सुमारे २०० आसनांची क्षमता असलेले हे कॉल सेंटर आहे. 'कमवा आणि शिका' या योजनेखाली इथे विद्यार्थी काम करतात; त्यासाठी त्यांना आवश्यक ते तीन आठवड्यांचे प्रशिक्षण कंपनीतर्फे दिले जाते. दिवसाचे प्रत्येकी साडेचार तास हे विद्यार्थी काम करतात आणि त्याबद्दल त्यांना दरमहा सुमारे पाच हजार रुपये वेतन दिले जाते. मुख्य म्हणजे ग्राहकांशी फोनवरून संवाद कसा साधायचा आणि आधुनिक इंटरनेट व संगणक-यंत्रणा कशी हाताळायची याचे शिक्षण या सेंटरमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळते. शिक्षणक्षेत्र व उद्योगक्षेत्र यांच्यात परस्परसहकार्य असावे या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या उद्दिष्टानुसार इथे प्रत्यक्ष कार्यवाही केली गेली आहे हे विशेष महत्त्वाचे. पण एकूण गरज विचारात घेता या उपक्रमाची व्याप्ती खूपच सीमित वाटते. श्रीरामपूरप्रमाणेच पंढरपूर व मंचर येथेही रयतच्या शाखांमध्ये या कंपनीतर्फे अशीच सेंटर्स कार्यान्वित व्हावीत अशी रावसाहेबांची इच्छा होती व त्या दृष्टीने त्यांनी बरेच प्रयत्नही केले होते; पण त्या प्रयत्नांना यश लाभलेले नाही. अर्थात कॉल सेंटरमधील काम ही अगदी पहिली पायरी आहे, ही पदवीधर तरुणाची आयुष्यभरासाठीची करिअर होऊ शकणार नाही याची जाणीव खुद्द रावसाहेबांनाही आहेच. शिवाय कॉल सेंटरच्या कामासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा एकूण कौशल्यविकसनाचा (स्किल्स डेव्हलपमेंटचा) एक खूप छोटा हिस्सा आहे. कर्मवीरांच्या दृष्टीने शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे हत्यार होते. आज त्या परिवर्तनाच्या दृष्टीने पदवीचा कागद तेवढा देणारे शिक्षण अगदीच अपुरे ठरत आहे. भविष्यात या दिशेने खूप लांबचा पल्ला रयतला गाठावा लागेल. अलीकडच्या आमच्या एका भेटीत Swiss Vocational Education and Training Switzerland's Source of Richness या एका छोटेखानी पुस्तकाविषयी रावसाहेब सांगत होते. त्यात मांडल्याप्रमाणे, आणि इतरही अनेकांच्या निरीक्षणांनुसार, पाश्चात्त्य समाजात हायस्कूल पूर्ण केल्यानंतर खूपच थोडे विद्यार्थी पदवीचा पाठपुरावा करतात; बहुतेकांचा कल व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त असे तांत्रिक शिक्षण अजुनी चालतोची वाट... ३६०