पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत ना खासगी उद्योगधंद्यांकडे. काही मूठभर गुणसंपन्न वा नशिबवान तरुणांना या अशा नोकऱ्या मिळत आहेत, नाही असे नाही, पण त्यांची संख्या मूठभरच आहे. बहुसंख्य सुशिक्षित तरुणाई आज समाजाच्या अनुत्पादक वर्गातच समाविष्ट होत आहे. त्यांतले काही जण निरुद्देश शिक्षण लांबवत अर्थहीन पदव्या मिळवण्यामागे आहेत, काही जण आईवडलांच्या कमाईवर डोळा ठेवून आहेत, काही जण एखादी किडूकमिडूक नोकरी करत आहेत तर काही जण चक्क समाजविघातक कृत्यांमध्ये सामील होत आहेत. 'रिकामे डोके म्हणजे सैतानाची कार्यशाळा' (‘Empty mind is devil's workshop') असे म्हणतात ते सार्थच आहे. त्याचवेळी जिथे माणसांची गरज आहे तिकडे कामाला योग्य अशी माणसे मिळत नाहीत अशीही परिस्थिती आहे. शेतीचे काम अगदी ऐरणीवर आले असताना मजूर मिळत नाहीत, म्हणून शेतकरी हवालदिल झालेले असतात. नारळ पाडायला कोणी नाही म्हणून लाखो झाडांवरचे नारळ किनारपट्टीवर सुकून जातात. कुठल्याही छोटया वा मध्यम व्यावसायिकाला विचारा; माणसे मिळत नाहीत ही तक्रार कायम आहे. डॉक्टरपासून बिल्डरपर्यंत आणि कारखानदारापासून दुकानदारापर्यंत प्रशिक्षित माणसांचा प्रचंड तुटवडा सगळ्यांनाच जाणवत आहे. याचे कारण समाजाच्या प्रत्यक्षातल्या गरजा आणि शिक्षणसंस्था देत असलेले शिक्षण यांच्यात कुठेच मेळ बसत नाही हे आहे. "आम्ही भरती करतो त्या इंजिनियर्सपैकी फक्त दहा टक्के इंजिनियर्समध्ये अपेक्षित ते ज्ञान असते व उर्वरित नव्वद टक्के हा अगदीच कच्चा माल असतो. या तरुणांना किमान सहा महिने आम्हांला प्रशिक्षण द्यावे लागते. तेवढा वेळ आणि पैसा खर्च केल्यानंतरच हे तरुण नोकरी लावण्याजोगे, एम्लॉयेबल, बनतात, " असे एका मोठ्या भारतीय आयटी कंपनीच्या प्रमुखाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते. आपल्या समाजापुढचा हा अतिशय गंभीर असा प्रश्न आहे आणि यातून निर्माण होणारी बेकारी व विषमता ही एकूणच सामाजिक सुरक्षेला खूप घातक ठरू शकेल. याची जाणीव खरे तर बहुतेक सर्वच शिक्षणतज्ज्ञांना आहे. या विषयावर भरपूर चर्चा झालेली आहे आणि आजही होत असते. पण चर्चा खूप आणि प्रत्यक्ष कृती मात्र अगदी नावापुरती, अशीच एकूण परिस्थिती आहे. रावसाहेबांनी पुढाकार घेतलेला 'दिशादर्शक प्रकल्प' हे या दिशेने टाकलेले एक उत्तम पाऊल होते; पण श्रीरामपूरचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्यासारखा एखाददुसरा अपवाद वगळता अन्य कोणी प्राचार्य यात फारशी आस्था दाखवीत नाहीत असे स्वतः रावसाहेब म्हणतात. या संदर्भात श्रीरामपूरच्या रयत संकुलात सुरू केलेल्या Business Process Outsourcing (BPO) सेंटरचा गौरवाने उल्लेख करायला कर्मवीरांच्या वाटेने... ३५९