पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांची व रावसाहेबांची गाठ अगदी अचानक अशी पडली. एका स्थानिक मित्राच्या बोलण्यात भुतेकर नावाचा उल्लेख झाला तेव्हा कुतूहलाने रावसाहेबांनी अधिक चौकशी केली. त्या मित्राबरोबर रावसाहेब त्यांना भेटायला गेले. पंचवटीमध्ये गोदावरीकाठी असलेल्या एका मठात ते राहत होते. खूप आजारी होते आणि असहाय होते; भीष्मासारखे शरपंजरी पडले होते. केवळ डोळ्यांवरून हे तेच डॉ. भुतेकर हे रावसाहेबांनी ओळखले. रावसाहेब क्रांतिकार्यात सहभागी आहेत हे ऐकून त्यांना खूप समाधान वाटले, रावसाहेबांना त्यांनी आशीर्वादही दिला. पण त्यांची तब्येत इतकी खालावलेली होती, की अधिक काही संभाषण अशक्यच होते. जड अंत:करणाने रावसाहेबांनी त्यांचा निरोप घेतला. दोघांची पुनर्भेट नंतर कधीच झाली नाही, पण डॉ. भुतेकरांच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा पगडा रावसाहेबांच्या मनावर कायमचा राहिला. मराठी सातवीपर्यंतच्या देवठाणच्या त्या शाळेत बडवे नावाचे हेडमास्तर होते. त्यांनी रीतसर पाचवीच्या वर्गात रावसाहेबांना प्रवेश दिला. लौकरच म्हातारबा रामभाऊ तोरकडी नावाचे एक तरुण, तडफदार व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक शाळेत आले. उंच, बळकट बांध्याचे तोरकडी मास्तर शिकवण्यातही खूप तरबेज होते. त्यांनी लौकरच काही हुशार विद्यार्थी हेरले व त्यांच्यावर विशेष मेहनत घ्यायला सुरुवात केली. रात्री या विद्यार्थ्यांना ते शाळेतच अभ्यासासाठी बोलवायचे. कंदिलाच्या उजेडात त्यांचा अभ्यास घ्यायचे. त्यांची रात्री झोपायची सोयही तोरकडी तास्तरांनी शाळेतच केली होती. लौकरच रावसाहेब मास्तरांचे आवडते विद्यार्थी बनले. त्यांची हुशारी बघून मास्तरांना एक निराळीच कल्पना सुचली - रावसाहेबांना मिडलस्कूल स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवायचे त्यांनी ठरवले. या स्कॉलरशिपच्या परीक्षेला त्याकाळी शहरी विद्यार्थीच प्रामुख्याने बसायचे; ग्रामीण भागात असल्या परीक्षांची फारशी कोणाला माहिती नव्हती. रावसाहेबांनीतर या परीक्षेचे कधी नावही ऐकले नव्हते. त्यावेळी शहरी आणि ग्रामीण अशा स्कॉलरशिपसाठी वेगळ्या जागा नसायच्या; एकूण जिल्ह्यातील फक्त पहिल्या नऊ विद्यार्थ्यांनाच स्कॉलरशिप मिळायची. त्यांत ग्रामीण विद्यार्थ्यांचा नंबर लागणे खूप अवघडच होते. शहरी भागातल्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागात नसायच्या; शैक्षणिक वातावरणाची परंपराही नव्हती. अकोल्याच्या तालुका शाळेतील शिक्षकांनी तोरकडी मास्तरांची त्यांना सुचलेल्या कल्पनेवरून चांगलीच खिल्ली उडवली. ते म्हणायचे, "अरे, अशा खेडवळ विद्यार्थ्याचा तिथे टिकाव लागत असतो का? ' कसं कळत नाही ? तू अपयशी ठरणार यावर आम्ही पैज मारायला तयार तुला परगावच्या शाळेत हे ३५