पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ध्यानी घेतला नाही, या विचाराने मन उद्विग्न होते. ( ध्यासपर्व, पृष्ठ ५१५-६ ) पण रयतच्या मर्यादांची जाणीव असूनही रयतचे मोठेपण रावसाहेब पुरते ओळखून होते व म्हणूनच त्यांनी रयतमधून त्यावेळी राजीनामा दिला नसावा. रयतच्या संदर्भात उद्याचा विचार करताना जाणवते, की भविष्यातील रयतची वाटचाल निश्चित करण्यासाठी काही वेगळ्या दिशांचा शोध घेणे आवश्यक आहे. रयतच्या आजच्या नेतृत्वाला या नव्या दिशांनी विकसित होण्यात व त्यासाठी स्वत:मध्ये आवश्यक ते बदल घडवून आणण्यात कितपत यश मिळते यावरच रयतचे भविष्यातील योगदान अवलंबून असणार आहे. उत्क्रांतिवादाचा उद्गाता चार्ल्स डार्विन म्हणाला होता : "It is not that the strongest or the most intelligent of the species survive, but those species survive who are most responsive to the coming changes." ("सर्वांत बळकट किंवा सर्वांत बुद्धिमान जीव तगतात असे नाही, तर जे जीव बदलत्या परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद देतात, ते जीव तगतात. ") डार्विनचे हे वचन रावसाहेबांच्या आवडीचे आहे व खूपदा ते हे वचन उद्धृत करत असतात. जीवसृष्टीप्रमाणेच ते संस्थांच्या बाबतीतही खरे आहे. भविष्याचा विचार करताना चार प्रमुख आव्हाने रयतसमोर आहेत आणि त्या दिशांनी उचलल्या जाणाऱ्या पावलांचा विचार व्हावा असे वाटते. पहिले आव्हान विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे (स्किल्स डेव्हलपमेंट) हे आहे. भारत हा युवकांचा देश आहे असे म्हटले जाते आणि अन्य जगाच्या तुलनेत युवकांची, म्हणजेच कमावत्या हातांची टक्केवारी भारतात सर्वाधिक आहे. यालाच डेमॉग्रॅफिक डिव्हिडंड (लोकसंख्यात्मक फायदा) असेही म्हटले जाते. पण ही प्रचंड संख्येने असलेली तरुणाई ही जमेची बाजू (अॅसेट) ठरायला हवी असेल तर ही तरुणाई उत्पादक (प्रॉडक्टिव्ह) असायला हवी; अन्यथा ही तरुणाई म्हणजे ऋणाची बाजू (लायाबिलिटी) ठरेल. आज आपली शिक्षणयंत्रणा बेकारांची प्रचंड फौज तयार करत आहे. हातात पदवीचा कागद घेऊन दरसाल लक्षावधी तरुण बाजारात उतरत आहेत आणि त्या प्रत्येकाला दरमहा उत्तम पगार देणारी, शरीर कमीत कमी कष्टवणारी आणि आयुष्यभरासाठी जास्तीत जास्त सुरक्षितता देणारी अशी नोकरी हवी आहे; पण दुर्दैवाने तशा नोकया ना सरकारकडे उपलब्ध अजुनी चालतोची वाट... ३५८