पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिक्षणाचा हा सगळाच प्रश्न खूप गुंतागुंतीचा बनला आहे आणि अनेक पुस्तके लिहूनही या प्रश्नाच्या सगळ्या बाजू वाचकांसमोर आणणे अवघड आहे. आपल्याला बहुजनसमाजाला शिक्षण द्यायचे आहे म्हणजे नेमके काय करायचे आहे याविषयी कर्मवीरांच्या मनात अतिशय सुस्पष्ट अशी कल्पना होती. गावकऱ्यांनी श्रमदानातून शाळा उभारावी, शैक्षणिक साहित्याचे काहीही अवडंबर माजवू नये, मूठ-मूठ धान्य गोळा करून गावकऱ्यांनी शिक्षकाचा पगार उभारावा, शिक्षकानेही केवळ पोटापुरते कमवावे आणि शिकवावे, विद्यार्थ्यांनीही 'कमवा आणि शिका' हा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कष्ट करावे आणि शिकावे, अशाप्रकारे हातांनी काम करणे हेच खरे शिक्षण आणि असे स्वावलंबी शिक्षण घेऊन तयार होणारे विद्यार्थीच पुढे आपल्या अवतीभवतीचा समाज बदलतील अशा स्वरूपाची साधारण त्यांची विचारसरणी होती. प्रबोधनाची धगधगती मशाल या आपल्या कर्मवीर चरित्रात कर्मवीरांचे विचार मांडताना पृ. १५१-२वर श्री. काटकर लिहितात : " मुंबई प्रांताचे कै. भाऊसाहेब हिरे हे महसूलमंत्री होते. त्यांनी मालेगावला शिक्षणसंस्था स्थापन केली आहे. पूर्वीपासून त्यांना शैक्षणिक कार्याबद्दल आत्मीयता होती व त्याप्रमाणे त्यांचे कार्य चालू आहे. एकदा त्यांनी मालेगाव येथे महाराष्ट्रातील सर्व शिक्षणतज्ज्ञांना बोलावून एक परिषद भरविली. स्वत:च्या शैक्षणिक संस्थेची पुनर्रचना करण्याचे ठरवून शिक्षणतज्ज्ञ श्री. जे. पी. नाईक यांच्याकडे त्यांनी काम सोपविले. या परिषदेस कर्मवीर गेले होते. भाऊसाहेबांनी ज्या संस्था चालविल्या होत्या त्या संस्था उपस्थित असलेल्या सर्वांनी पाहिल्या. यात आदिवासी मुलांचे वसतिगृहही पाहिले. या वसतिगृहात सर्व साहित्य उंची प्रकारचे होते. स्टेनलेस स्टीलची भांडी, लोखंडी कॉट्स, उत्तम प्रकारचे कपडे इ. पाहिल्यावर सर्वांनी याचे कौतुक केले. परंतु कर्मवीरांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'ज्या विद्यार्थ्यांच्या आई-बापांना राहण्यास साध्या झोपड्यादेखील नाहीत, अंगावर लाज राखण्याइतके वस्त्र नाही, त्यांच्या मुलांना अशा थाटात ठेवणे अयोग्य आहे. ही मुले सुट्टीत घरी जाणार नाहीत. त्यांना आईबापाची, भावंडांची ओढ राहणार नाही. तेव्हा अशा विद्यार्थ्यांना साधे कपडे, साधी भांडी व साधा बिछानाच द्यावयास पाहिजे. जो काही खर्च करावयाचा असेल तो त्यांच्या शालोपयोगी साहित्यासाठी करा, परंतु या विद्यार्थ्यांचे घरचे राहणीमान लक्षात ठेवून त्यांच्यासाठी खर्च करा. या विद्यार्थ्यांनी सुट्टीत घरी गेले पाहिजे, त्यांच्या आई-वडिलांना मदत केली पाहिजे. अभ्यासक्रम पुरा झाल्यावर व नोकरी लागल्यावर त्यांनी आपले घर अजुनी चालतोची वाट... ३५६