पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रोजी लिहिला होता. रावसाहेबांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर रयतने शासनाशी बराच संघर्ष केला आणि शेवटी तो अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे सरकारला भाग पडले. गेली सहा वर्षे रावसाहेब रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत व त्यापूर्वीची तीस वर्षे ते संस्थेचे व्हाइस- चेअरमन होते. त्यापूर्वीची कर्मवीरांच्या वेळची रयतही त्यांनी जवळून बघितली आहे. या कालावधीत संस्थेने केलेल्या प्रगतीबरोबरच संस्था कुठे-कुठे कमी पडत गेली, कुठे-कुठे अपप्रवृत्तींचा शिरकाव होत गेला हेही त्यांची शोधक नजर टिपत गेली आहे. या बाबतीतले आपले विचार रावसाहेबांनी वेळोवेळी नि:संदिग्धपणे व्यक्त केले आहेत आणि हे विचार अनेकदा केवळ रयतपुरते सीमित नसून देशातील एकूण शिक्षणक्षेत्रालाही लागू पडणारे आहेत. एके ठिकाणी रावसाहेब लिहितात : "भाऊरावांनी चांगली माणसे निर्माण केली. त्या माणसांनी समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. श्रम करून शिक्षण घेतले. अशी माणसे निर्माण करण्यात आज रयत शिक्षण संस्था अपुरी पडत आहे. संस्थेची संख्यात्मक वाढ खूप झाली आहे; तथापि जीवनमूल्यांची जोपासना व खरी ज्ञानोपासना यांबाबत गुणात्मक प्रगतीचा आलेख वर जाण्याऐवजी तो खाली वळणार की काय अशी शंका मनात घर केल्याशिवाय राहत नाही. जेवढा विद्यार्थी अधिक शिक्षण घेतो, तेवढा तो कामापासून आणि समाजापासून दूर जातो. हे तर शिक्षणाचे अध:पतनच म्हणायचे. संस्थेची उपक्रमशीलता क्षीण झाल्याचे दिसते. विद्यार्थ्यांत तर तिचा पूर्ण अभाव. नोकरीसाठी आलेल्या, पदव्यांची शेपटी लावलेल्यांनी गांधी, टागोर, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र वाचलेले नसते. इतर ग्रंथांच्या वाचनाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. सगळी शिक्षणपद्धती परीक्षार्थी झाली आहे. रयत शिक्षण संस्था याला अपवाद आहे असे म्हणणे अवघड आहे. संस्थेच्या सेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ कधीच येऊन ठेपली आहे. आपला चेहरा आरशात पाहिल्यास तो कुरूपतेकडे वाटचाल करीत असल्याचे आम्हांला नक्कीच दिसून येईल. ऑस्कर वाइल्डच्या 'पिक्चर ऑफ दि डोरियन ग्रे' या कादंबरीतील नायकाप्रमाणे कुरूपतेने संपूर्ण ग्रासून कोसळून पडण्यापूर्वीच आम्ही जागे होणे जरूर आहे." ( शिक्षण आणि समाज, पृष्ठ ५४ - ५ ) अजुनी चालतोची वाट... ३५२