पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हॉलंटरी शाळा सुरू झाल्या त्या काळात आणि ती एक सरकारी योजनाच होती. त्यांचे मित्र अणासाहेब लठ्ठे त्यावेळी मुंबई प्रांताचे अर्थमंत्री होते व त्यांनीच पुढाकार घेऊन खेर - मोरारजी मंत्रिमंडळाला ती योजना पटवून दिली होती. त्या शाळांचे सरकारीकरण झाल्यावर पुढे पुन्हा रयतच्या कामात मंदी आली होती. त्यावेळी कर्मवीर आणि तत्कालीन महाराष्ट्रातले सर्वांत मोठे नेते यशवंतराव चव्हाण यांच्यात बरेच अंतर होते. अशा परिस्थितीत कर्मवीरांच्या काही हितचिंतकांनी पुढाकार घेतला आणि दोघांच्यात दिलजमाई घडवून आणली. कर्मवीरांचे चिरंजीव अप्पासाहेब पाटील यांनी याविषयी विस्ताराने लिहिले आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या समाजात शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत प्रचंड प्रमाणावर सरकारीकरण झाले आहे. कुठल्याही मोठ्या संस्थेला सरकारशी वैर परवडणारे नाही. आज सर्वच मान्यता प्राप्त शाळांमधील कर्मचाऱ्यांचा पगार सरकारतर्फे दिला जातो. शिक्षणावर सरकार दरसाल खर्च करत असलेल्या हजारो कोटी रुपयांपैकी बहुतेक रक्कम ही शिक्षक व शाळेतील शिक्षकेतर सेवक यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन यावरच खर्च होते. ग्रंथालये, प्रयोगशाळा, इमारती वगैरे असंख्य गोष्टींकरिताही शासकीय अनुदानावरच अवलंबून राहावे लागते. एखाद-दुसरी शाळा पूर्णतः स्वबळावर चालवणे एकवेळ शक्य होईल, पण रयतच्या शेकडो शाळांचा पसारा सरकारी मदतीशिवाय चालवणार कसा? अर्थकारणाव्यतिरिक्तही असंख्य परवाने घ्यावे लागतात, असंख्य वेळा शासनदरबारी जावेच लागते. अर्थात हे फक्त रयतच्याच बाबतीत घडते असे नाही; कुठल्याही मोठ्या शिक्षणसंस्थेच्या संदर्भात हे तेवढेच खरे आहे. या सर्व परिस्थितीची अनुभवजन्य जाणीव रावसाहेबांना आहे व म्हणूनच राजकारण्यांशी जुळवून घेण्यात संस्थेचे हितच आहे हे त्यांना ठाऊक आहे. राजकीय नेत्यांबरोबरच्या मैत्रीचे हेही एक कारण असू शकते. अर्थात जेव्हा शासनाशी भांडायचा प्रसंग आला तेव्हाही कधी रावसाहेबांनी कच खाल्लेली नाही हे नमूद करावे लागेल. उदाहरणार्थ, नव्या तुकड्या सुरू करण्यापूर्वी शाळांना व महाविद्यालयांना शासनाकडून घ्याव्या लागणाऱ्या परवानगीचा प्रश्न. ही पद्धत (प्रोसिजर) खूप किचकट बनली आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्राचे तत्कालीन उच्च आणि तांत्रिक शिक्षणमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांना रावसाहेबांनी १९ जुलै २००१ रोजी लिहिलेले पत्र बोलके आहे. त्यात रावसाहेब लिहितात : "महाविद्यालयांच्या दाराशी ग्रामीण भागात शेकडो विद्यार्थी प्रवेशासाठी बसून आहेत. पालक आणि विद्यार्थी दूरदूर अंतरावरून उपाशीतापाशी खेटे घालीत आहेत. ते कॉलेजकडे प्रवेशाची भीक मागत आहेत. आणि आम्ही कर्मवीरांच्या वाटेने... ३४९