पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देणाऱ्या आणि स्वतः राजकारणात कुठल्याही प्रकारे सहभागी नसलेल्या व्यक्तीने राजकारण्यांशी कसे जुळवून घेतले हा. याचे एक उत्तर असे असावे, की राजकारणातील सत्तालालसा, त्यातील संधीसाधूपणा, त्यातील भ्रष्टाचार यांविषयी सतत बोलले जात असले, आणि त्यात बरेच तथ्यही असले, तरी हेही खरे आहे, की कुठलाही राजकीय नेता आपल्या प्रत्येक व्यवहारात भ्रष्ट नसतो. त्याला एक चांगली बाजूही असते, आपल्या हातून काही चांगले काम व्हावे ही आसही त्याला असते. उराशी ध्येयवाद बाळगूनच कोणी एके काळी त्याने राजकारणाची वाटचाल सुरू केलेली असते. आणि रावसाहेब त्या चांगल्या बाजूवर भर देतात व चांगुलपणाच्या आविष्कारावरच आपली मैत्री उभारतात. दुसरे उत्तर असे असावे, की या मैत्रीचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी रावसाहेब कधीच करून घेत नाहीत. स्वतःसाठी एखाद्या महामंडळाचे वा महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपद मागून घेणे, शासकीय खर्चाने होणाऱ्या परदेशदौऱ्यामध्ये स्वतःची वर्णी लावणे, सरकारी कोट्यातून स्वतःसाठी फ्लॅट वा भूखंड मिळवणे असा प्रकार रावसाहेबांनी कधीच केलेला नाही. अशा प्रकारचा व्यक्तिगत भ्रष्टाचार आड़ न आल्यामुळे राजकारण्यांबरोबरचे त्यांचे नाते निर्मळ राहिलेले आहे. तिसरे उत्तर असे देता येईल, की काही राजकीय नेत्यांमध्ये असे अनेक चांगले गुण असतात, की ज्यांपासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे असते. उदाहरणार्थ, त्यांची न दमता काम करण्याची क्षमता, जनसंपर्क, मैत्री जोपासण्यासाठी लागणारा दिलदारपणा, प्रागतिक व आधुनिक बनायचा प्रयास, प्रदीर्घ अनुभवातून अंगी बाणलेली माणसांची पारख किंवा एकूण विकाससन्मुख दृष्टिकोन स्वभावतः गुणग्राहक असलेल्या रावसाहेबांना हे विशेष आकर्षित करतात व त्यांचे कौतुक करताना अन्य काही बोचऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करायची रावसाहेबांची तयारी असते. जगात तसे कोणीच परिपूर्ण व सर्वगुणसंपन्न नसते हे रावसाहेबांना अनुभवान्ती पटलेले आहे. आणि याचे चौथे उत्तर संस्थात्मक पातळीवर देता येईल व तेच कदाचित सर्वाधिक ग्राह्य असू शकेल – ते म्हणजे सत्तेशी जुळवून घेतल्यामुळे संस्थेचा होणारा फायदा. अगदी कर्मवीरांचे उदाहरणही या संदर्भात अभ्यास करण्यासारखे आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे व काहीशा फटकळ बोलण्यामुळे कर्मवीरांचे सुरुवातीची अनेक वर्षे राजकारण्यांबरोबर कधीच जुळले नाही; आणि त्या काळात त्यांच्या कार्याची वाढही फारशी झाली नाही. त्यांनी गरूडझेप घेतली ती अजुनी चालतोची वाट... ३४८