पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वार्षिक सभेत सांगितले होते. यशवंतराव राज्याचे मुख्यमंत्री होते. "तुम्हांला सर्वांत अधिक आनंद कधी वाटला?" या प्रश्नाला उत्तर देताना ते एकदा म्हणाले होते, "मी मुख्यमंत्री झालो त्यापेक्षाही अधिक आनंद मला मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झालो त्यावेळी झाला.' यशवंतरावांच्या पश्चात वसंतदादा पाटील यांनी ही भूमिका दोन-तीन वर्षांसाठी बजावली. त्यानंतर आता गेली २७ वर्षे शरदराव पवार रयतचे अध्यक्ष आहेत. राज्यातल्या सर्वोच्च स्थानावरील नेत्यांशी असलेली ही जवळीक संस्थेच्या दृष्टीने खूप हितकारक ठरली आहे. व्यक्तिशः देखील रावसाहेब शरदराव पवार यांना खूप मानतात हे त्यांच्या बोलण्यात आणि लेखनातही वरचेवर जाणवते. तसे पाहिले तर रावसाहेब आणि त्यांचे बंधू अण्णासाहेब यांचा पवार कुटुंबीयांशी खूप पूर्वीपासूनचा स्नेह आहे. शरदराव पवार यांचेही रयत संस्थेबरोबरचे नाते खूप जुने आहे. पुण्याला लॉ कॉलेजात शिकत असतानाच रावसाहेब व वसंतराव पवार यांची मैत्री जुळली होती. पुढे शेती व दुग्धव्यवसायातील वेगवेगळ्या प्रयोगांबाबत रावसाहेब अप्पासाहेब पवारांच्या संपर्कात राहिले होते. प्रवरानगर कारखान्यात ओव्हरसीअर म्हणून नोकरी करणारे आपले मोठे बंधू आप्पासाहेब यांच्याकडे राहत असताना रयतच्या तेथील शाळेत शरदराव एक वर्ष शिकतही होते. संस्थेशी असलेले त्यांचे नातेही तसे जुने आहे. अध्यक्ष होण्यापूर्वी अनेक वर्षे ते संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य होतेच. ज्यांना त्यांनी गुरू मानले त्या यशवंतरावांच्या पश्चात शरदरावांनी त्या पदी असणे हे तसे सुसंगतही वाटते. या संदर्भात एक मुद्दा आवर्जून नोंदवायला हवा. गेली सहा वर्षे रावसाहेब रयतचे चेअरमन आहेत व त्या पदावर काम करताना अध्यक्षांबरोबर त्यांचा वारंवार संपर्क येत राहिला आहे. त्यांच्या मते शरदराव पवार यांनी संस्थेच्या दैनंदिन कामात कधीही तक्षेप केलेला नाही. त्याचप्रमाणे संस्थेला मार्गदर्शन करताना किंवा अडचणीच्या वेळी मदत करताना त्यांनी कधी हात आखडताही घेतला नाही. दरवर्षी ९ मे रोजी सातारा येथे कर्मवीरांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होतो. त्यानंतर लगेचच तिथे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होते. अध्यक्षस्थानी शरदराव असतात. पुरेसा वेळ काढून आणि पूर्वतयारी करूनच ते या सभेला येतात. सभेतील त्यांचे भाषण रयत संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. कारण त्यात ते संस्थेच्या गतसालातील वाटचालीचा आढावा घेतातच, पण अधिक महत्त्वाचे म्हणजे आगामी वर्षात कुठले कार्यक्रम हाती घ्यावेत याविषयीची त्यांची मतेही ते मांडतात. हे अध्यक्षीय दिशादिग्दर्शन खूप महत्त्वाचे ठरत आले आहे. रावसाहेब म्हणतात, “रयतच्या संदर्भात बोलायचे तर आज त्यांच्यामुळेच संस्थेत अजुनी चालतोची वाट... ३४६