पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८६मध्ये थांबवले तरी अप्रत्यक्षरीत्या त्यांची वकिली त्यानंतरही सुमारे पाच वर्षे सुरू राहिली; १९९१ मध्ये मात्र रावसाहेब वकिली व्यवसायातून पूर्णपणे निवृत्त झाले. रयतचे काम करताना आर्थिक झीजही रावसाहेबांना सोसावी लागत होती हाही एक मुद्दा या संदर्भात विचारात घेण्यासारखा आहे. म्हणजे रयतच्या कामासाठी द्यावा लागणारा वेळ आणि करावा लागणारा प्रवास यामुळे वकिलीकडे होणारे दुर्लक्ष व पर्याप्त आर्थिक नुकसान हा एक मोठा भाग होताच; पण त्याशिवाय स्वतःच्या खिशातून प्रत्यक्ष केला जाणारा खर्च हाही एक भाग होता. ते संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचा सदस्य व व्हाइस चेअरमन झाल्यापासून कामासाठी त्यांच्याकडे लोकांची वर्दळ सुरू झाली. येणाऱ्या सर्वांची ऊठबस करणे, त्यांना चहापाणी करणे, कधीकधी जेवणाचेही आतिथ्य करणे आवश्यक ठरायचे. वर्षानुवर्षे हे असेच चालत आलेले. शिवाय १९७६-७७पासून तो १९९१-९२पर्यंत संस्थेच्या अशा कामासाठी त्यांनी संस्थेच्या कोणत्याही सेवकाची कधीही मदत घेतली नाही. लोकांच्या अशा कामासाठी लिखाणही बरेच करावे लागत असे. स्टेशनरीसाठी खूप खर्च व्हायचा, तसेच पोस्टेजसाठीदेखील. त्याचप्रमाणे संस्थेच्या बैठका व इतर कामे यांसाठी त्यांना पंचवीस-तीस वर्षांमध्ये सातत्याने खूपच प्रवास करावा लागला. हा सगळा प्रवास ते स्वतःच्या वाहनाने आणि स्वतःच्याच खर्चाने करत आले आहेत. व्हाइस चेअरमनपदावर निवड झाल्यावर पहिल्या वर्षा-दोन वर्षांच्या काळात प्रसंगी संस्थेचे वाहन अथवा संस्थेची सुविधा त्यांना पुरविण्यात आली होती; तथापि वर्षा दोन वर्षांच्या काळानंतर ही सुविधा घेण्याचे त्यांनी स्वतःहूनच बंद केले. संस्थेसाठी ही झीज त्यांनी सोसली ती सामाजिक कार्यावरील त्यांच्या निष्ठेमुळेच. इथे हे नमूद करायला हवे, की संस्थेसाठी स्वतः झीज सोसण्याची त्या काळात रयतमध्ये एक श्रेष्ठ परंपरा होती. कर्मवीरांनी १९३५ साली स्थापन केलेल्या सातारा येथील पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून चार वर्षे विनावेतन काम करणाऱ्या के. एस. दीक्षितांविषयी रयतमध्ये खूप आदराने बोलले जाई. अत्यल्प वेतनावर वडाळा महादेव येथील १५० एकरांची शेती सांभाळणाऱ्या नाना साळुंकेंविषयी याच प्रकरणात पूर्वी लिहिलेच आहे. कर्मवीरांच्या काळात साताऱ्याचे प्रख्यात वकील इस्माईल मुल्लासाहेब यांनीही त्याचप्रकारे काहीही वेतन वा फी न घेता वर्षानुवर्षे संस्थेचे सचिव म्हणून काम केले; संस्थेसाठी स्वतःच्या खिशातून केलेल्या खर्चाचीही त्यांनी कधी परतफेड (रीइंबर्समेंट) मागितली न अजुनी चालतोची वाट... ३४४