पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या व्यवसायाने यशाचे शिखर गाठलेले होते. अशा स्थितीत व्यवसाय सोडणे व्यवहारी जगाच्या दृष्टीने वेडेपणाचेच होते. कोपरगाव, श्रीरामपूर आणि इतरही काही ठिकाणच्या ज्येष्ठ वकिलांनी त्यांना अक्षरशः वेड्यात काढले. कोपरगावचे एक ज्येष्ठ वकील वसंतराव कोन्हाळकर हे तर चक्क म्हणाले, "अरे, शिंदे, तुझं डोकं फिरलं की काय?” ऐकणाच्या सगळ्या वकिलांनीही त्यांना दुजोरा दिला. अर्थात रावसाहेबांचा निर्णय पक्का होता. व्यवसायात गुरफटून राहून पैसे मिळवीत राहिले, तर मग साहित्य, कला, शिक्षण, संस्कृती, सार्वजनिक काम आणि मित्रांचा स्नेहभाव यांच्या विश्वात आपण मनसोक्तपणे कसे रमू शकणार; आपल्या जीवनाचे वकिली हेच ध्येय होणार का; असे विविध विचार त्यांच्या मनात घर करून बसले होते. वकिलीच्या व्यवसायात ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याच्या कामी ते झटत होते, तसेच आर्थिक अडचणीमुळे गरिबांचे कोर्टाचे काम अडू नये म्हणून त्यांना ते मदतही करत होते. नवरा-बायको, एका कुटुंबातले घटक, शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्यामध्ये आपापसांत असलेले कितीतरी वाद कोर्टात जाऊ न देता ते मिटवीत होते. त्याशिवाय कोर्टामध्ये गेलेल्या कित्येक वादांतही ते आपसात तडजोडी घडवून आणीत होते. ह्या सर्व बाबी समाजाला उपयुक्त होत्या आणि म्हटले तर ही एक समाजसेवाही होती. तथापि ह्या मर्यादित लाभासाठी सदैव व्यवसायात गुंतून राहणे त्यांना उचित वाटत नव्हते. एकूण सगळ्या परिस्थितीचे विश्लेषण करून वकिलीच्या व्यवसायातून मुक्त होण्याचा निर्णय त्यांनी पक्का केला. अर्थात ज्या व्यवसायात आपण इतकी वर्षे काढली त्या व्यवसायातून बाहेर पडणे खूप अवघडच असते. पण १९८६नंतर हळूहळू रावसाहेबांनी आपला निर्णय प्रत्यक्षात आणला. सुरुवातीला त्यांनी नवीन काम घेणे थांबवले. ज्या केसेस हाती होत्या त्या त्यांनी एकेक करत संपवल्या. अॅड. भागचंदजी चुडीवाल, अॅड. अशोकराव तांबे व अॅड. उस्मान शेख या आपल्या मदतनिसांचे उत्तम सहकार्य त्यांना या बाबतीत मिळाले. अर्थात पक्षकारांशी त्यांचे अनेक वर्षांचे संबंध होते. त्यांच्याशी असलेले नाते एकाएकी तोडणे अशक्य होते; सल्लामसलतीसाठी ते येतच राहिले; पण त्यांच्या नव्या केसेस त्यांनी नव्या वकिलांकडे न्याव्यात यासाठी रावसाहेबांनी त्यांना राजी केले. याशिवाय वेगवेगळ्या कारखान्यांचे व संस्थांचे कायदेविषयक सल्लागार म्हणून रावसाहेब अनेक वर्षे काम पाहत होते. त्यांच्यापैकी काहींबरोबरचे करार दीर्घकालीन होते. आवश्यक अशी त्यांची कामे रावसाहेब करत गेले. अशा प्रकारे काळा डगला घालून कोर्टात जाण्याचे रावसाहेबांनी कर्मवीरांच्या वाटेने... ३४३