पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळाले आहे,” असे ते म्हणतात. रावसाहेबांचे ड्रायव्हर म्हणून काम करणारे श्रीरामपूरचे कय्यूम रशीद सय्यद म्हणतात, "साहेब पाठीशी आहेत याचा मला खूप मोठा आधार वाटतो. माझ्या मुलाने एकदा चक्क घासलेट प्यायलं होतं. साहेबांच्या मुलाने, डॉ. राजीवने त्याला बरं केलं. त्याला जीवदानच दिलं. आज तो एम.ए. पास झाला आहे. माझ्या मुलीनेही बी.एस्सी. केलं आहे. मी एक साधा वॉचमन म्हणून काम करायचो, पण साहेबांनी मला सन्मानाने वागवलं. ड्रायव्हर बनवलं. आज मी आयुष्यात सेटल झालोय तो केवळ त्यांच्यामुळे." रावसाहेब आणि कय्यूम यांना एकत्र पाहिले की कर्मवीर आणि त्यांचा ड्रायव्हर उद्धव यांची जोडी कशी दिसत असेल याची थोडीफार कल्पना येते. ही केवळ काही उदाहरणे आहेत. रावसाहेबांपासून ज्यांना खूप काही शिकायला मिळाले अशांची संख्या खूप मोठी आहे व ही सर्वच माणसे रावसाहेबांबद्दल भरभरून बोलतात. १९७८ साली व्हाइस- चेअरमन झाल्यानंतर रावसाहेबांचा रयतमधला सहभाग खूपच वाढला व त्या कामात वेळही खूप जाऊ लागला. संस्थेची कार्यकारी समिती, समन्वय समिती व उच्चशिक्षण समिती यांचे ते आता पदसिद्ध सदस्य बनले. त्याशिवाय वेगवेगळ्या कामांसाठी वेळोवेळी विशेष समित्या नेमल्या जात व खूपदा त्यांचेही सदस्यत्व वा अध्यक्षपद रावसाहेबांकडे असे. मॅनेजिंग कौन्सिलची बैठक दर दोन किंवा तीन महिन्यांतून एकदा होत असे. उच्चशिक्षण समिती आणि समन्वय समिती यांच्या बैठका गरजेनुसार प्रत्येक शैक्षणिक सत्रात (टर्ममध्ये) एकदा किंवा दोनदा होत असते. या सर्व बैठका सातारा येथील मुख्य कार्यालयातच असत. त्यामुळे त्यांना वरचेवर श्रीरामपूरहून साताऱ्याला जावे लागे. तिथे जाणे म्हणजे एक दिवस जायला, एक दिवस यायला व एक दिवस प्रत्यक्ष बैठकीसाठी असे सलग तीन दिवस जात. संस्थेची विभागीय कार्यालये अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व पनवेल येथे आहेत. तिथेही वेळोवेळी बैठका होत. संस्थेचे कार्यकर्ते व सेवक यांच्या घरांतील शुभकार्ये तसेच दुःखाचे प्रसंग यांनाही उपस्थित राहावे लागे. अशा सगळ्या लोकांना भेटण्यात अतोनात वेळ जाई. आनंदवन, जर्मन हॉस्पिटल, घरची शेती अशी इतरही रयत व्यतिरिक्तची कामे खूप असत. वकिलीसाठी वेळच उरत नसे. हळूहळू त्यांनी वकिलीच्या व्यवसायातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या कामी शशिकलाताईंनीही झटकन होकार देऊन संमती दिली. वास्तविक त्यावेळी अजुनी चालतोची वाट... ३४२