पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणून वाढलो असलो तरी आता रावसाहेब हेच आपल्याला पितृस्थानी आहेत" असे ते म्हणतात. "सत्कार करण्याऐवजी ते पैसे सत्कार्याला द्या, असा संदेश देऊन रावसाहेबांनी आपल्याला कसं प्रेरित केलं आणि त्यातून मग बाबा आमटे यांच्या आनंदवनाला नियमित मदत द्यायला आपण कशी सुरुवात केली" हे प्रा. शरद दुधाट सांगतात. रावसाहेबांचे लेखनिक म्हणून आज ते विनावेतन काम करतात, त्यांचा बराचसा पत्रव्यवहार सांभाळतात ते या संस्कारांमुळेच. "रावसाहेबांमुळेच आपण प्रवरानगर सोडून श्रीरामपुरात कसे स्थायिक झालो, रयतच्या इमारतींचे बांधकाम तर केलेच पण त्यांच्याशी कौटुंबिक पातळीवरही कसे जोडले गेलो, त्यांच्या मार्गदर्शनाने मुलाचा पोटाचा आजार कसा बरा झाला आणि मुलीच्या लग्नातही त्यांनी कसे लक्ष घातले," याच्या आठवणी आर्किटेक्ट म्हणून श्रीरामपूर व शिर्डी येथे व्यवसाय करणारे प्रकाश निकम पाटील सांगतात. वेळोवेळी उद्भवणारी रयत संस्थेतली अनेक बांधकामाची व दुरुस्तीची कामे ते वर्षानुवर्षे अतिशय किफायतशीर फीमध्ये व चांगल्याप्रकारे करत आले आहेत. 'रयतचे काम म्हणजे स्वतःच्याच घरचे काम' अशी त्यांची निष्ठा आहे आणि त्यांच्यात तो जिव्हाळा मुख्यत: रावसाहेबांमुळे निर्माण झाला आहे. रावसाहेबांची शालीनता, केलेल्या उपकारांचा कधीही उल्लेख न करणे, कुठलेही काम सांगताना "विनंती करतो... जर तुमची काही अडचण नसेल तर...' ." असे नम्रपणे म्हणणे, बी. कॉम. नंतर १७ वर्षांनी एम.कॉम. करायला आपल्या पत्नीला प्रेरणा देणे, अशा अनेक आठवणी सांगताना बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के अगदी रंगून जातात. "माझ्या वाढदिवसाचे पाहुणे रयतचे पाहुणे नाहीत" म्हणत एका कार्यक्रमाचा सगळा जेवणखर्च रावसाहेबांनी कसा दिला आणि "इतरांना देण्यातही आनंद असतो" हे आपण त्यांच्यापासून कसे शिकलो वगैरे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरून कृतज्ञता ओसंडून वाहत असते. आज आपण जे कोणी आहोत ते केवळ रावसाहेबांनी हात दिला म्हणून आहोत आणि "ते आयुष्यात आले नसते तर आज मी लेकुरवाळी आखाडा या माझ्या छोट्या धनगर वस्तीतच मेंढ्या हाकताना दिसलो असतो," अशी प्रांजळ कबुली मूळ नेवाशाजवळचे पण आता नोकरीनिमित्त पुण्यात असलेले प्रा. बाबासाहेब शेंडगे देतात. "रावसाहेबांमुळेच मी शिकलो, रयतमध्ये नोकरीला लागलो. मी रोज खातो त्या भाकरीवर मला त्यांची सही दिसते. आज माझी शेतीवाडी आहे, गावात घर आहे, पुण्यात फ्लॅट आहे, दारात नवी कोरी मोटार आहे. हे सगळे माझ्या स्वप्नांपलीकडचे आहे आहे आणि ते रावसाहेबांमुळेच कर्मवीरांच्या वाटेने... ३४१