पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाना ताडकन उभे राहून "मला एवढी पगारवाढ नको" असे एकदम खड्या आवाजात बोलले. बैठकीतले सर्व जण अवाक् झाले. नानांच्या योगदानाच्या मानाने संस्था करीत असलेली पगारवाढ फार नव्हती; पगार केवळ सतराशे रुपये दरमहा होणार होता. त्या आधी नाना फक्त बाराशे पन्नास रुपये दरमहा पगार घेत असत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, उन्हा- पावसात थंडीवायत ते कष्टत होते. स्वत:च्या घरच्या शेतीसाठीदेखील कोणी घेणार नाही अशी झीज नाना घेत होते. पण नानांनी ही पगारवाढ स्वीकारली नाही. ज्यांचे मनःपूर्वक सहकार्य रयतच्या कामात रावसाहेबांना लाभले त्यांपैकी नाना साळुंके हे एक उत्तम उदाहरण. पण या चरित्रलेखनाच्या संदर्भात अशा अनेक सहकाऱ्यांना भेटायचा योग आला, रावसाहेबांबरोबर काम करतानाचे त्यांचे अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकता आले. मोखाडा येथील आश्रमशाळांचे प्रमुख म्हणून काम करताना "आपण देत असलेल्या पौष्टिक आहारामुळे आदिवासी मुलांची वजनं वाढत आहेत, तब्येती सुधारत आहेत आणि त्यातून त्यांची अभ्यासातही प्रगती होत आहे," हे ऐकल्यावर वंचितांविषयी खराखुरा कळवळा असणारे रावसाहेब किती आनंदित झाले हे प्राचार्य लक्ष्मणराव दाजी भोर सांगतात. ते स्वत: अकोले तालुक्यातील आदिवासी भागातले एका उसतोडणी कामगाराचे पुत्र आहेत; अतिशय कष्ट करून वर आले आहेत. रावसाहेबांची आदिवासींविषयीची आत्मीयता त्यांना साहजिकच खूप भावते. आश्रमशाळेतील मुलांना केवळ रावसाहेबांनी दिल्यामुळे आयुष्यात प्रथमच आइसक्रीम कसे खाता आले हेही ते गहिवरलेल्या स्वरात सांगतात. "घरी भेटायला आलेल्या लोकांमुळे जेवायला वेळ मिळाला नाही आणि कॉलेजात मिटिंग सुरू झाल्यावर काही खाता येणार नाही, म्हणून वाटेतच दोन केळी विकत घेणारे आणि कॉलेजच्या मुख्य गेटसमारे गाडी थांबवून गाडीतच ती केळी खाणारे रावसाहेब, " डाकले महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य टी. ई. शेळके यांना आठवतात आणि त्यातून दिसणारा रावसाहेबांचा वक्तशीरपणा आणि आपल्यामुळे इतरांचा वेळ फुकट न दवडायची त्यांची दक्षता व कर्तव्यबुद्धी यांचे शेळके कौतुक करतात. " आपल्या दुर्धर पोटदुखीवर इलाज ठरू शकतील अशा व्यायामप्रकारांची माहिती देणारे आणि एवढंच नव्हे तर आपल्या घरी आले असताना अंगावरचे कपडे उतरवून त्या व्यायामाचं प्रात्यक्षिकही दाखविणारे निरागस रावसाहेब, " प्रा. डॉ. बाबूराव दत्तात्रेय उपाध्ये यांना प्रकर्षाने आठवतात आणि "आपण अनाथ अजुनी चालतोची वाट... ३४०