पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शकेल हे उघडच होते. नाना निवृत्त झाल्यावर केवळ रावसाहेबांच्या आग्रहास्तव ते ही जबाबदारी स्वीकारायला तयार झाले. दरमहा सातशे रुपये इतके कमी मानधन घेऊन. शेतीतील तोट्याची कारणे तशी उघड होती. संस्थेचे तथाकथित हितचिंतक म्हणवणारे काही जण संस्थेच्या खताच्या गोण्या राजरोस उचलून नेऊन आपल्या पिकाला टाकीत. संस्थेने कामाला लावलेल्या रोजंदारीच्या मजुरांना संस्थेच्या शेताच्या चालू कामावरून उठवून आपल्या शेतात नेऊन आपले काम करून घेत; त्यांचा पगार मात्र संस्थेलाच द्यावा लागे. बांधकामासाठी प्रसंगी सिमेंट आणले असता त्यातल्या काही गोण्याही उचलून नेत. बेकायदेशीररीत्या पाटाचे पाणी आपल्या पिकाला भरीत व त्याचा पंचनामा आणि दंडाची आकारणी मात्र संस्थेच्या नावाने करवून घेत. शेती माल विक्रीला मार्केट कमिटीच्या नियंत्रणाखाली न देता तो खासगी व्यापाराला दिला जात असे. त्याशिवाय संस्थेच्या काही सेवकांच्या घरीही त्यातले धान्य जात असे. ही सर्व हकिकत ऐकून रावसाहेब विमनस्क झाले. सार्वजनिक संस्थेच्या मालमत्तेची देखभाल करणारी व्यक्ती प्रामाणिक आणि कार्यक्षम नसेल तर त्यामुळे किती नुकसान होऊ शकते, याचे हे एक विदारक उदाहरण होते. नाना साळुंके यांनी शेतीचे काम पाहण्यास सुरुवात केली. ते शिस्तीला इतके कडक, की त्यांनी संबंधितांची डाळ शिजू दिली नाही. त्यांच्यावर काही जण मारायला धावल्याच्याही घटना घडल्या. नानांचे वय तसे ५८ वर्षांचे असूनही त्यांनी मोठ्या धाडसाने जवळचे खोरे उचलून "तुझ्याच टकोन्यावर ह्या खोऱ्याचा दणका देतो. तू पुढे येऊनच पाहा!" असा दम भरला. नाना खूप धीट व लढाऊ होते. ते कोणालाच घाबरत नव्हते. गुरे चारणारे, सरपण तोडणारे, पिकाची कणसे, कपाशीचा कापूस काढणारे अशा विविध तऱ्हेच्या लोकांचा नानांनी बंदोबस्त करून टाकला. त्या कामी त्यांना खूपच त्रास सोसावा लागला. नानांनी शेतीच्या कामात स्वत:ला पूर्ण झोकून दिले. ते शेतीत इतके कष्ट घेत, की त्याला काही सुमारच नव्हता. पाच-दहा वर्षांच्या काळातच चाळीस हजार रुपयांची कर्जाची फेड नानांनी केली. सोसायटीचे कर्जही घेणे बंद केले. स्वभांडवलावर शेतीचा आर्थिक व्यवहार मार्गी लावला. नवीन ट्रॅक्टर घेतला. त्याचेही कर्ज फेडले. विहिरी खोदल्या. जुन्या विहिरींची दुरुस्ती केली. काही पाइपलाइन टाकल्या. काही शेतीची लेव्हलिंग केली. इतकेच नाही तर गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे देवस्थानाला जीर्णोद्धारासाठी चाळीस हजार रुपयांची देणगीही दिली. सुमारे पंधरा वर्षांच्या कारकिर्दीनंतर समितीने एकमताने नानांच्या पगारवाढीचा ठराव मंजूर करण्याचे ठरवले. रावसाहेबांनी तो ठराव समितीपुढे मांडला. त्याबरोबर कर्मवीरांच्या वाटेने... ३३९