पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वडाळा महादेव येथे शाळा सुरू करताना तिथल्या ग्रामस्थांनी महादेव देवस्थानाची दीडशे एकर जमीन नाममात्र खंडाने रयतला दिली होती. स्वतः कर्मवीरांनी ती मिळवली होती. त्या जमिनीवरील शेतीच्या उत्पन्नातून शाळेचा खर्च भागावा यासाठी रयतने त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर ती जबाबदारी सोपवली होती. त्यांनी शेतीकामासाठी कुंभार नावाचा एक मुकादम नेमला होता. पण त्याच्याकडून ते काम नीट होत नव्हते व त्यामुळे शेती तोट्यात होती. त्याबाबत काय करता येईल हे पाहण्यासाठी १९७६-७७ साली संस्थेचे तत्कालीन चेअरमन शंकरराव काळे व रावसाहेब वडाळा येथे गेले. सगळे गावकरी जमले होते. वडाळा महादेव देवस्थानाला जीर्णोद्धारासाठी शेतीच्या उत्पन्नातून कमीत कमी चाळीस हजार रुपये देणगी द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. प्रत्यक्षात त्यावेळी शेतीतच वर्षाला चाळीस हजारांचा तोटा होता. शिवाय काही व्यापाऱ्यांचे देणे, इरिगेशनची पाणीपट्टी, खत इत्यादीचे बिल, सोसायटीची फी असे विविध तऱ्हेचे देणे झाले होते. संस्थेनेही त्याची गांभीर्याने दखल घेतली नव्हती. वर्षानुवर्षे असाच कारभार चालला होता. गावकरी संतापून बोलत होते. "शेतात तोटा येतो, तेव्हा मंदिराला देणगी कशी देता येईल ?" असा सवाल काळेसाहेबांनी गावकऱ्यांना केला. त्यावर "तोटा येतो तर मग शेती कशाला करता ?” असे संतापाने सभेतले एक तरुण गृहस्थ चढ्या आवाजात बोलले आणि "शेती सोडून द्या, गावाच्या ताब्यात देऊन टाका," अशी त्यांनी मागणी केली. "आम्ही शेती सोडण्यास तयार आहोत, तुम्ही शेती घेऊ शकता, " असे उद्विग्न उद्गार काळेसाहेबांनी काढले. अर्थात शेती कोण ताब्यात घेणार याबाबत गावकऱ्यांचे एकमत होणे शक्य नव्हते; कारण गावात बरेच गटतट होते. बऱ्याच गरमागरम चर्चेनंतर शेतीचे व्यवस्थापन रावसाहेबांकडे सोपवण्याचा निर्णय होऊन सभा संपली. रावसाहेबांनी शेतीची जबाबदारी नानासाहेब साळुंके यांच्यावर सोपवली. नानासाहेब साळुंके हे नुकतेच सरकारी शेतीखात्यातून निवृत्त झाले होते. शेतीतले तज्ज्ञ, अतिशय कार्यक्षम व खूप प्रामाणिक अशी त्यांची ख्याती होती. मोठ्या शेतीवाल्या दोन-तीन बागायतदारांनी त्यांना आपल्या शेतीधंद्यात भागीदारी देऊ केली होती. पण आता नोकरी करायची नाही असे त्यांनी मनोमन ठरवले होते. निवृत्तीच्या प्रसंगी त्यांना निरोप देण्याचा समारंभ रावसाहेबांच्या हस्तेच झाला होता. योग्य माणूस निवडला तरच शेतीचा कारभार यशस्वीरीत्या चालू अजुनी चालतोची वाट... ३३८