पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उचलावी लागतात. १९७७ ते १९८० या दरम्यान या विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्तीचे जंगलच माजले होते. विद्यार्थिनींची छेडछाड, स्नेहसंमेलन व निवडणुकीच्या प्रसंगी अनेक अनिष्ट घटना, तसेच आपापसात मारामाच्या, रस्त्यावर मिरवणुका, गटागटांतील स्पर्धांचे ओंगळवाणे प्रदर्शन, कॉपी पकडणाऱ्या प्राध्यापकांना मारहाण करणे असे अनेक प्रकार उघडकीस यायला लागले व बरेचसे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या अरेरावीच्या वर्तनाने त्यांच्या दडपणाखालीच राहू लागले. प्राचार्यदेखील हतबल झाले होते. शेवटी रावसाहेबांनी सूत्रे आपल्या हाती घेतली. स्नेहसंमेलन, निवडणुका बंद केल्या. त्याचबरोबर एका वर्षी सुमारे ३०-३५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले. ते अतिशय धाडसी पाऊल होते. त्यामुळे रावसाहेबांना विद्यार्थी, पालक व राजकीय पुढारी यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. त्यांच्या घरीदेखील सुमारे शंभरएक विद्यार्थ्यांनी धरणे धरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सर्व तऱ्हेच्या विरोधाला समर्थपणे तोंड दिले. काही दिवसांतच सारे काही शांत झाले. महाविद्यालयामध्ये बेशिस्तीला आळा बसला. विद्यार्थिनी सुरक्षितपणे वावरू लागल्या. महाविद्यालयामध्ये रावसाहेब शिस्तीचे वातावरण आणू शकले, तथापि त्यांच्या मनामध्ये या संबंधाचे प्रश्न मात्र तसेच घोंगावत राहिले. कॉपी करताना पकडले म्हणून एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाला गजाने मारले होते. त्याचे वडील 'माझा मुलगा तसं करणार नाही हो; हे सर्व खोटं आहे,' असे म्हणत दोन-तीन वेळेस रावसाहेबांकडे आले. त्यावेळी झालेल्या चर्चेच्या ओघात बापाने एक अतिशय विदारक सत्य कबूल केले. "साहेब ! माझा मुलगा मलासुद्धा प्रसंगी मारतो. त्याची मला भीती वाटते. केवळ त्याच्या सांगण्यावरून त्याची बाजू मांडण्यासाठी मी तुमच्याकडे येतो काय करावं तेच मला समजत नाही," असे म्हणून तो बाप अक्षरशः ओक्साबोक्सी रडायला लागला. या सगळ्या अनुभवामुळे रावसाहेबांच्या मनात खूप खळबळ माजली. या खळबळीतूनच पुढे त्यांनी 'संस्कार केंद्र सुरू केले. पुढील प्रकरणात तो भाग विस्ताराने येणार आहे. कुठल्याही संस्थात्मक सामाजिक कार्यात प्रामाणिक व कर्तृत्ववान सहकारी लाभणे अतिशय महत्त्वाचे असते; अंतिमत: त्यांच्या कामावरच तुमचे यश अवलंबून असते. रावसाहेबांनाही असे काही सहकारी मिळत गेले. अर्थात रावसाहेबांनी ही त्यांना योग्य ते स्वातंत्र्य व पाठबळ दिले. नानासाहेब साळुंके हे अशांपैकीच एक. कर्मवीरांच्या वाटेने ... ३३७