पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. अण्णासाहेबही केंद्रीय कृषिखात्यात सलग पंधरा वर्षे मंत्री म्हणून वावरले; पण त्यांनाही उपमंत्री व राज्यमंत्री म्हणूनच राहावे लागले, कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना स्थान दिले गेले नाही याची यासंदर्भात आठवण होते. कुठलीही गोष्ट घडण्यासाठी तो विशिष्ट योग यावा लागतो हेही खरे असेल का? रयतचे व्हाइस चेअरमन म्हणून कार्यरत असताना रावसाहेबांनी जी कामे केली त्यांतला एक मानबिंदू म्हणजे श्रीरामपूरच्या बी.एड. कॉलेजचा विस्तार तसे हे कॉलेज १९७० सालीच सुरू झाले होते पण कॉलेजची स्वतःची इमारत नव्हती. बोरावके महाविद्यालयाच्याच इमारतीत एका कोपऱ्यामध्ये एक वर्ग आणि एका लहानशा खोलीत या महाविद्यालयाचा प्रपंच कसाबसा थाटलेला होता. ही व्यवस्था अतिशय गैरसोयीची होती. हे महाविद्यालय सुरू झाले त्यावेळी भास्करराव गलांडे पाटील यांचा रयतच्या कामात खूप सहभाग असायचा. अशोक साखर कारखान्याचे ते चेअरमन होते. आणि रयतसाठी त्यांनी खूप देणग्याही मिळवल्या होत्या. त्यांच्याच आग्रहावरून या महाविद्यालयाला 'स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालय' हे नाव देण्यात आले. ते या महाविद्यालयासाठी भरीव देणगी देऊन इमारत उभी करतील अशी संस्थेची अपेक्षा होती. तथापि इमारतीच्या प्रश्नात कोणतीही प्रगती होऊ शकली नव्हती. या महाविद्यालयाच्या लोकल मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन म्हणून रावसाहेब काम पाहत होते. इमारतीचा प्रश्न हा अतिशय तातडीचा व गरजेचा प्रश्न म्हणून त्यांच्यापुढे उभा होता. पंधरा वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही महाविद्यालयाची इमारत नसावी हे शल्य मनाला टोचणी देत होते. तालुक्यातील सहकारी साखर कारखाने व सहकारी संस्थांची आर्थिक अवस्था बिकट होती. देणग्या मिळविणे जिकिरीचे होते. तरीही १९८५ ते १९९० या पाच वर्षांच्या कालावधीत नेटाने प्रयत्न करून रावसाहेब वीस-पंचवीस लाखांच्या आसपास देणगी मिळविण्यात यशस्वी होऊ शकले. सुरुवातीला त्यांनी महाविद्यालयाची मुख्य इमारत व ग्रंथालयाची इमारत पूर्ण केली. त्या इमारतीचे उद्घाटन १५ जानेवारी १९९५ रोजी संस्थेचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाविद्यालयाची बेघर अवस्था संपली व महाविद्यालयाचे काम स्वतःच्या इमारतीत सुरू झाले. पुढे काळाच्या ओघात कॉन्फरन्स हॉल, प्रयोगशाळा या वास्तूही उभ्या राहिल्या. प्राचार्य शंकरराव अनारसे यांच्या प्रयत्नाने महाविद्यालयाला दोन-तीन वर्षे व्हेकेशन कोर्सची परवानगी मिळाली होती. त्या कोर्समुळेही उत्पन्न मिळण्यास हातभार कर्मवीरांच्या वाटेने... ३३५