पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेसिडेंटचे काम मुख्यतः मार्गदर्शकाचे असते. (रयतमध्ये हृदयांचे मराठीकरण झालेले नाही; चेअरमन व प्रेसिडेंट हीच पदसंबोधने रूढ आहेत.) संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे पद नसतानाही रावसाहेबांनी प्राचार्य चिटणीसांबरोबर काम करायला सुरुवात केली हे महत्त्वाचे आहे. बहुतांशी गरीब अशा ग्रामीण भागातून देणग्या मिळवणे हे तसे खूपच अवघड काम होते. बरेच प्रयत्न करावे लागत, बरीच दारे ठोठवावी लागत. खूपदा निराशा पदरी पडायची तर कधी अपेक्षेपेक्षा अधिक पदरी पडायचे. असाच एक अनुभव प्रवरानगरचा होता. प्राचार्य चिटणीस व रावसाहेब प्रवरा सहकारी साखर कारखान्यावर गेले. त्यावेळी रावसाहेब त्या कारखान्याचे कायदा सल्लागार होते. त्यावेळेस नेमकी तेथे कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चालू होती. बाळासाहेब विखे पाटील त्यावेळी कारखान्याचे चेअरमन होते. त्यांनी रावसाहेबांना मिटिंग हॉलमध्ये बोलवले. येण्याचे प्रयोजन कळल्यावर बाळासाहेब म्हणाले, "रावसाहेब ! तुम्हीच माझ्या खुर्चीत बसून महाविद्यालयाला किती देणगी द्यायची तो निर्णय घ्या. आकडा सांगा!" बाळासाहेबांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने रावसाहेबांना काहीसे संकोचल्यासारखे झाले. खेळीमेळीच्या वातावरणातच त्यांनी पन्नास हजार रुपयांची देणगी मोकळ्या मनाने देऊ केली. रावसाहेबांना व प्राचार्य चिटणीसांना एवढ्या मोठ्या रकमेचा प्रतिसाद अनपेक्षित होता. नंतर रावसाहेबांनी गणेश सहकारी साखर कारखाना व इतरही काही संस्थांकडून त्याच दिवशी जवळ जवळ एक लाख रुपये देणगीदाखल मिळविले. म्हणतात, "प्राचार्य चिटणीसांनी रयत संस्थेला माझ्या कामाविषयी तपशीलवार माहिती दिली असावी असे मला दिसून आले. त्याचाच परिपाक म्हणून की काय, पण मला १९७६ साली संस्थेचे सदस्यत्व देऊन नंतर मॅनेजिंग कौन्सिलवरही घेण्यात आले आणि लगेचच व्हाइस चेअरमनपदावरही माझी नियुक्ती करण्यात आली.. " रावसाहेबांना अनुकूल असे रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलचे मत बनले याला त्यांचे वडील बंधू अण्णासाहेब यांनी रयतसाठी दिलेले भरीव योगदान हेही कारणीभूत ठरले असेल असे म्हणता येईल. २००८ साली रयतचे चेअरमन म्हणून रावसाहेबांची तीन वर्षांसाठी प्रथम निवड झाली, पण त्यापूर्वी १९७८ ते २००८ असा तीस वर्षांचा प्रदीर्घ काळ त्यांना व्हाइस चेअरमन या पदावरच काढावा लागला हेही लक्षात घेण्यासारखे अजुनी चालतोची वाट... ३३४