पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वभाववैशिष्ट्यानुसार या घटनेचा त्यांनी कधी गवगवाही केला नाही वा कधी तिचे भांडवलही केले नाही. संस्थेचे बोरावके महाविद्यालय पुढे याच जागेत स्थलांतरित झाले. डाकलेशेटजींनी दिलेल्या दोन लाख रुपयांच्या देणगीतून १९६२ साली संस्थेने चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स सुरू केले होते. वेणूताई दाभोळकर त्याच्या पहिल्या प्राचार्या होत्या. त्याही कॉलेजचे स्थलांतर पुढे याच जागेत झाले. संकुलातील या दोन महाविद्यालयांव्यतिरिक्त पुढे स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड. कॉलेज) आणि साकरबेन करमशीभाई सोमैय्या विद्यामंदिर व संस्कार केंद्र यांची आवारात स्थापना झाली. अशा रयतच्या एकूण चार शाखा या संकुलात आज कार्यरत आहेत. पुढे काळाच्या ओघात मार्गदर्शन इमारत, प्रयोगशाळा, वसतिगृहे यांचीही उभारणी झाली. अशा सर्व सुसज्ज इमारतींमुळे श्रीरामपुरातील हे रयत शिक्षण संकुल आज अतिशय देखणे बनले आहे. पण आजच्या या भव्य इमारती एकेक करतच उभ्या राहिल्या आणि प्रत्येक इमारत खूप प्रयत्नांनंतरच उभी राहिली. कर्मचाऱ्यांचा पगार सरकारतर्फे मिळायचा पण इमारतींसाठी मात्र संस्थेलाच पैसे उभारावे लागत. • युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडून बांधकामासाठी अनुदान मिळायचे पण ते खूप तुटपुंजे होते. १९७४च्या जूनमध्ये माधवराव चिटणीस यांनी डाकले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. ते प्राध्यापक म्हणून उत्तम होतेच पण संस्थेचा सर्वांगीण विकास व्हावा याची त्यांना आच होती. रावसाहेबांची व त्यांची प्रथमपासूनच उत्तम मैत्री जमली. मुख्यतः त्यांच्याच विनंतीवरून रावसाहेबांनी निधिसंकलनाच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली. इथे एक गोष्ट नमूद करायला हवी. रावसाहेबांना रयतबद्दल आत्मीयता खूप असली तरी रयतच्या अधिकारश्रेणीत (hierarchyमध्ये) त्यांचा समावेश कुठेच नव्हता. कर्मवीरांनी प्रारंभकाळात घालून दिलेली रयत संस्थेची घडी तेव्हाही तशीच होती आणि आजही बहुतांशी तशीच आहे. मूलाधार असतो तो जनरल बॉडीचा. तिच्या सदस्यत्वासाठी काही निकष व विशिष्ट वर्गणी असते. (सध्या या बॉडीचे सुमारे ३०० सदस्य आहेत.) ही बॉडी मॅनेजिंग कौन्सिलची निवड करते. (सध्या या मॅनेजिंग कौन्सिलचे सुमारे २५ सदस्य आहेत.) ह्यानंतरचे पद व्हाइस चेअरमन. सचिव व सहसचिव यांचाही सहभाग असतोच. ९ मे ह्या कर्मवीरांच्या स्मृतिदिनी मॅनेजिंग कौन्सिलची सातारा येथील मुख्य कार्यालयात बैठक भरते. या बैठकीत, दर तीन वर्षांनी पदाधिकाऱ्यांची निवड होते. प्रेसिडेंट हे सर्वोच्च पद आहे. त्यानंतर चेअरमन. चेअरमन प्रत्यक्ष कार्यभार सांभाळतात, तर कर्मवीरांच्या वाटेने... ३३३