पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि तिथून पुण्याला दहा ऑगस्टला सकाळी कर्मवीर त्यांना आपल्याबरोबर पुणे विद्यापीठात घेऊन गेले. त्यावेळच्या नियमांनुसार परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचे असेल तर विद्यापीठात एक फॉर्म भरून द्यावा लागे. रजिस्ट्रारच्या ऑफिसात जाऊन कर्मवीरांनी तो फॉर्म मागून घेतला. पुण्याहून वकिलीची पदवी घेतलेली असली तरी लंडनला जाऊन बार ॲट लॉसाठी (बॅरिस्टर होण्यासाठी) प्रवेश घेण्याऐवजी रावसाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला प्रवेश घ्यावा अशी कर्मवीरांची इच्छा होती. हे दोन दिवस संपूर्ण वेळ ते दोघे एकत्रच होते. खरेतर त्यावेळी कर्मवीरांचे कार्य समाजात खूप मान्यता पावलेले होते. मोठेमोठे नेते, संस्थानिक त्यांच्यापुढे नतमस्तक होत. असे असतानाही कर्मवीरांनी स्वतः कष्ट घेऊन हा सगळा रावसाहेबांबरोबर इकडेतिकडे फिरण्याचा खटाटोप करावा म्हणजे नवलच होते. रावसाहेबांना उच्चशिक्षणासाठी परदेशी पाठवायची त्यांची इच्छा किती तीव्र होती हेच यावरून जाणवते. पुढे कर्मवीर, रयतचे सहसचिव शं. ब. सुखटणकर आणि प्रवरा कारखान्याचे आबा धुमाळ यांच्यात या संदर्भात काही पत्रव्यवहार झाला; काही पत्रे आजही उपलब्ध आहेत. दुर्दैवाने उर्वरित पंधरा हजार रुपये उभारण्याबाबत ठोस असे काही घडू शकले नाही. इथे हे नमूद करायला हवे, की संस्थेच्या कामात पुढे उपयोगी ठरावेत या दृष्टीने कर्मवीरांनी यापूर्वीही आठ तरुणांना उच्चशिक्षणासाठी असे परदेशी पाठवले होते व त्यांतल्या काहींनी भावी आयुष्यात रयतची उत्तम सेवाही केली. १९३८ साली परदेशी गेलेले शं. ब. सुखटणकर हे त्यांतले पहिले तर १९५७मध्ये परदेशी गेलेले एस. के. उनउने हे त्यांतले आठवे व शेवटचे. यांतल्या काहींचा सगळा खर्च कर्मवीरांनी केला होता तर काहींना त्यांनी थोडीफार मदत केली होती. पण ही सर्व मंडळी रयतशी प्रथमपासून निगडित होती. संस्थेबाहेरचे असूनही ज्यांना परदेशी पाठवायची कर्मवीरांची इच्छा होती असे रावसाहेब हे एकमेव. दुर्दैवाने रावसाहेबांच्या बाबतीत तो योग आला नाही. खरेतर सुरुवातीपासूनच परदेशी शिक्षणाला जाण्यासंबंधी लागणारा निधी लोकांकडून जमा करण्याची कल्पना रावसाहेबांच्या मनात संकोच निर्माण करीत होती. आपल्यासाठी अशी भिक्षांदेही नकोच अशी त्यांची भावना होती. त्यामुळे स्वतःला परदेशी शिक्षणासाठी जाता आले नाही याचा विषाद त्यांना अजिबात वाटला नाही; मात्र कर्मवीरांना काय वाटले असेल ही भावना त्यांना आजही क्लेश देते. श्रीरापुरात रयतचे कॉलेज सुरू करावे अशी कर्मवीरांची खूप इच्छा होती व त्यादृष्टीने त्यांनी नियोजनही केले होते. सुरुवात आर्ट्स आणि सायन्स कॉलेजपासून कर्मवीरांच्या वाटेने... ३३१