पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेव्हाही रावसाहेब त्यांच्याबरोबर होते. तिथला वाडा आणि बरीच मोठी जमीन ग्वाल्हेरचे महाराज शिंदे यांनी रयतला देणगी म्हणून दिली होती. वाड्याची बरीच पडझड झाली होती. बरीचशी जमीनही कुळांनी व्यापलेली होती. तिथून ग्वाल्हेर खूपच लांब असल्याने शिंदे सरकारचे इस्टेटीवर बारकाईने लक्ष असणे शक्यही नव्हते. ती इस्टेट बघता बघता तिथे काय करता येईल याचेही विचार कर्मवीरांच्या मनात घोळत होतेच. तिथे एक अध्यापक विद्यालय काढायची योजना त्यांच्या मनात आकार घेत होती. जामगावमधल्या प्रमुख गावकऱ्यांची एक सभा त्यांनी बोलावली व आपली योजना त्यांना समजावून सांगितली. अवकळा आलेला तो वाडा व भोवतालचे मोठे पटांगण साफसूफ करून घेणे हे प्राधान्याने उचलायला हवे असे पहिले पाऊल होते. त्यासाठी कर्मवीरांनी गावकऱ्यांना राजी केले, प्रत्यक्ष कामाचे नियोजन केले आणि अशाप्रकारे काम मार्गी लावून मगच कर्मवीरांनी जामगाव सोडले. गावातला शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ते गावकऱ्यांना कसे तयार करीत, लोकसहभाग कसा मिळवीत आणि नुसताच चर्चेचा घोळ घालत न बसता आहे त्या परिस्थितीतच प्रत्यक्ष कामाला कशी सुरुवात करीत याचा एक वस्तुपाठच या निमित्ताने रावसाहेबांना मिळाला. रावसाहेबांनी इंग्लंडला शिकायला जावे अशी कर्मवीरांची खूप इच्छा होती. स्वत:चे शिक्षण अपुरे झाले असले तरी उच्चशिक्षणाचे महत्त्व कर्मवीर जाणून होते आणि सर्वोत्तम शिक्षणासाठी त्याकाळी इंग्लंड ही पहिली पसंती असायची. एकदा श्रीरामपूरला अण्णासाहेबांकडे राहत असतानाच कर्मवीरांनी हा विषय काढला. योगायोगाने रावसाहेबही तेव्हा तिथे हजर होते. यासाठी सुमारे वीस हजार रुपये खर्च येईल असा कर्मवीरांचा अंदाज होता व त्यांपैकी पाच हजार रुपये संस्थेतर्फे द्यायला ते आनंदाने तयार होते. उरलेले पंधरा हजार रुपये कसे गोळा करता येतील याची चर्चा करण्यासाठी नंतर त्यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्यावर एक बैठकही घेतली. बैठकीला विठ्ठलराव विखे पाटील, शंकरराव धुमाळ, लामखेडे मास्तर, पी. बी. कडू पाटील, अण्णासाहेब आणि त्या भागातील इतर तीन-चार प्रमुख व्यक्ती हजर होत्या. दरम्यान १९५४च्या सुरुवातीला रावसाहेबांनी नाशिक येथे आपला वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. तिथेच आठ ऑगस्टला त्यांना अचानक कर्मवीरांची तार आली. 'नऊ ऑगस्टला फॅक्टरीवर येऊन मला भेटावे' अशी. त्यानुसार दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन रावसाहेब कर्मवीरांना भेटले. पुढला सगळा कार्यक्रम कर्मवीरांनी अगोदरच मनाशी पक्का केला होता. दोघे एकत्र श्रीरामपूरला आले अजुनी चालतोची वाट... ३३०