पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आता गेले. घाईघाईने त्यांनी उद्धवला बोलवून आणले, त्याचे पाटपाणी घेतले, त्याला सन्मानाने पंगतीत बसवले, त्याला सगळे पदार्थ वाढले. "उद्धव! कर रे सुरुवात!” हे सगळे झाल्यावर कर्मवीर त्याला म्हणाले. उद्धवने जेवायला सुरुवात केल्यावर मग "हं! आता करा सुरू !" असे कर्मवीर सर्वांना उद्देशून म्हणाले आणि त्यानंतर मगच त्यांच्या आणि इतरांच्या जेवणाला सुरुवात झाली. या उद्धवबद्दल रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी उपलब्ध करून दिलेली माहिती रोचक आहे. त्यांचे पूर्ण नाव उद्धव पांडुरंग कामठे. ते मूळचे सासवडजवळ राहणारे. कर्मवीरांचे बंधू बाळूकाका अबकारी खात्यात अधिकारी होते व त्यांच्या गाडीवर उद्धव ड्रायव्हर होते. १९४८ साली रयत संस्थेने सर्वप्रथम कर्मवीरांसाठी म्हणून एक मोटार घेतली व तेव्हा त्यांचे ड्रायव्हर म्हणून उद्धवनी महिना वीस रुपये पगारावर नोकरी धरली. तेव्हापासून ते १९५९मध्ये कर्मवीरांचे निधन होईस्तोवर सलग ११ वर्षे उद्धव सावलीसारखे कर्मवीरांबरोबर होते; त्यांची सर्व व्यक्तिगत देखभालही करत राहिले. कर्मवीरांचा प्रवास सतत चालू असायचा; त्यामुळे कधीकधी दोन-दोन, तीन-तीन महिने उद्धवना स्वतःच्या घरी जायला फुरसत मिळत नसे. कर्मवीरांच्या निधनानंतरही २२ वर्षे त्यांनी रयतमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. १९८२ साली ते निवृत्त झाले व त्यावेळी त्यांचा पगार महिना १००० रुपये होता. कर्मवीरांनी त्यांना नेहमीच खूप मायेने वागवले. त्यांचे आजोबा लष्करामध्ये मेजर या पदावर होते व त्यांना इंग्रज सरकारकडून मिरज तालुक्यातील कुपवाड येथे साडेनऊ एकर जमीन इनाम म्हणून मिळाली होती; पण ती कूळकायद्याने गेली होती. कर्मवीरांनी त्या प्रकरणात जातीने लक्ष घातले व ती जमीन उद्धवना परत मिळवून दिली. दोघांचे संबंध किती चांगले होते यावरही ह्या घटनेतून प्रकाश पडतो. महत्त्वाच्या रील माणसांना सगळेच मान देतात; पण खरी मोठी माणसे आपल्या हाताखाली राबणाऱ्या सामान्य माणसांनाही सन्मानाने वागवतात; किंबहुना सामान्य माणसांनाही आपण सन्मानाने वागवतो की नाही यावरच आपले मोठेपण खऱ्या अर्थाने ठरते. टाकळीभानच्या त्या प्रसंगातून हाही एक संस्कार कळत-नकळत रावसाहेबांच्या मनावर झाला. जेव्हा जेव्हा शक्य होई तेव्हा तेव्हा रावसाहेब कर्मवीरांबरोबर प्रवास करायची संधी सोडत नसत. प्रवासात होणाऱ्या अनौपचारिक गप्पा हीदेखील त्यांच्या दृष्टीने एक पर्वणी असे. एरवीही एकत्र प्रवास करताना माणसे एकमेकांशी अधिक जोडली जातात हे खरेच आहे. कर्मवीर पारनेर तालुक्यातील जामगावला गेले कर्मवीरांच्या वाटेने... ३२९