पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ परगावच्या शाळेत पाडळीच्या शाळेतली सहा वर्षे बघताबघता उडून गेली. तेथून १९३८ मध्ये रावसाहेब चौथी पास झाले. गावची ती शाळा फक्त चौथीपर्यंतच होती; त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावच्या शाळेत प्रवेश घेणे क्रमप्राप्त होते. देवठाण या शेजारच्या अकोले तालुक्यात असलेल्या मोठ्या गावातील मराठी शाळेत रावसाहेबांनी पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला. हा तालुका अहमदनगर जिल्ह्यात होता. देवठाण पाडळीपासून आठ-नऊ मैलांवर होते व त्यांनी हा प्रवास नेहमी पायीच केला होता; पण शाळेसाठी रोजच्या रोज अशी जा-ये करणे मात्र कठीण होते. म्हणून मग देवठाणला असलेल्या आपल्या उमाआत्येच्या घरी रावसाहेबांनी राहावे, असे वडलांनी ठरवले. शिक्षणानिमित्त नातेवाइकांकडे राहण्यात तेव्हा कोणाला फारसा संकोच वाटत नसे आणि त्या नातेवाइकांचीही भावना आपल्याच माणसाचे ओझे काय वाटायचे असे मानणारी होती. एकूणच तेव्हा नातेवाइकांमध्ये एकमेकांविषयी बऱ्यापैकी आस्था असायची. पुढे शहरीकरणात क्षीण झालेले पण शेतीधिष्ठित ग्रामीण जीवनात तेव्हा बऱ्यापैकी टिकून असलेले असे ते एक स्वभाववैशिष्ट्य होते. उमाआत्या रावसाहेबांची सर्वांत मोठी आत्या. तिचे पती गणपत पाटील सहाणे. मोठी शेतीवाडी, गुरेढोरे असा त्यांचा पसारा होता. इथली जमीन खूप सुपीक होती. देवठाणमध्ये त्यांचे दोनमजली घर होते पण ते आपल्या गावाबाहेरच्या वाडग्यात राहत. समोर एकरभर मोठे अंगण होते. गणपत पाटलांचे व्यक्तिमत्त्व समोरच्याला धाक वाटावा असे होते. घर समृद्ध असले तरी त्याकाळी सर्वांनाच अंगमेहनत करावी लागे. रावसाहेबांनाही तिथे रोज सकाळी लौकर उठून गाईबैलांचे शेण काढावे लागे, गोठा व आवार झाडावे लागे, मग गाई-बैल सोडून त्यांना नदीवर पाणी दाखवायला न्यावे लागे. गाई रानात चरायला जायच्या; गोठ्यातील परगावच्या शाळेत ३३