पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एवढे सुटीतले वर्ग, जादा तास, रात्रंदिवस अभ्यास, होमवर्क, परीक्षांचं चक्र, मार्कांची शर्यत, सगळ्या मुलामुलींनी चरकात पिळून निघाल्यासारखं नीरस होऊन निघणं, दप्तराच्या आणि अभ्यासाच्या ओझ्याखाली रगडून जाणं आणि पालकांनीही त्याच चिंतेत असणं, हे असं का? मी शिक्षणक्षेत्रातला कार्यकर्ता आहे, ज्ञान- विज्ञानाच्या कक्षा विस्तारित होताहेत याची मला जाणीव आहे; तरीही शिक्षणाचं आजचं हे जीवघेणं चित्र मला उमजत नाही." या प्रश्नाची सोपी उत्तरे नाहीत, हे खरेच आहे. "The child is father of the man' " ("लहान मूल म्हणजे माणसाचा बापच ") असे विलियम वर्डस्वर्थ या प्रख्यात इंग्रज कवीने म्हटले आहे. त्याच्या या साध्या वाक्यात केवढा आशय भरलेला आहे! बालपणी आपल्यावर जे संस्कार होतात, त्यांवर आपण मोठेपणी कसे घडणार हे खूपदा ठरते. आयुष्यातले अनेक महत्त्वाचे धडे आपण अभावितपणे बालपणातच गिरवत असतो. रावसाहेबांच्या आयुष्याचा आढावा घेताना बालपणातल्या संस्कारांचे हे महत्त्व प्रकर्षाने जाणवते मग ते निसर्गप्रेम असो की श्रमसंस्कार, धाडस असो की गरिबांविषयीचा - कळवळा, गाण्यांची आवड असो की सामाजिक बांधिलकी. त्यांना घडवण्यात पाडळीतल्या बालपणाचा वाटा खूप मोठा आहे. रावसाहेबांच्या भावी वाटचालीत पाडळीच्या पाऊलखुणा जागोजागी दिसतात. अजुनी चालतोची वाट... ३२