पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असलेल्या क्रांतीबद्दल रावसाहेबांकडून त्यांनी खूप काही ऐकले होते. 'मास एज्युकेशन’बाबतचे माओचे प्रयोग विलक्षण होते. मोकळ्या मैदानात, गावातल्या चौका-चौकात तिथे शाळा चालवल्या जात होत्या. शैक्षणिक साधनसामग्रीही काही नसायची. पण त्या सगळ्या अडचणींवर मात करून बिनभिंतीच्या त्या शाळांमधून शेकड्यांनी विद्यार्थी एकेका वेळी शिकत होते. ध्येयवादाने पेटलेले तरुण कार्यकर्ते-शिक्षक हाच त्या हजारो शाळांचा आधारस्तंभ होता आणि मूलभूत शिक्षणासाठी तो पुरेसा होता. प्रवासात जाता-येता खूपदा कर्मवीर आणि रावसाहेब यांच्यात अशा गप्पा चालत. "चीनला जाऊन हे सगळं प्रत्यक्ष बघण्याची माझी खूप इच्छा आहे," असेही कर्मवीर त्यावेळी म्हणाले होते. अर्थात प्रत्यक्षात हा योग कधीच आला नाही. त्या दिवशी कर्मवीरांबरोबर टाकळीभानला दिलेल्या भेटीतला आणखी एक प्रसंग रावसाहेब कधी विसरू शकले नाहीत. बैठक ठेवल्यावर सगळी प्रमुख मंडळी जेवायला बसली. त्या वेळेपावेतो कर्मवीरांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली होती. मोठ्या थाटात ३०-४० जणांची पंगत बसली; पण जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात कर्मवीर खणखणीत आवाजात म्हणाले, "अरे माझा ड्रायव्हर उद्धव कुठे आहे? त्याला जेवायला बसवा." उद्धवला ते कटाक्षाने आपल्याबरोबरच जेवायला बसवत. " " त्यालाही बसवतो अण्णा, पण तुम्ही सुरू करा, " गांगरून यजमानांनी खुलासा केला. पण त्याने कर्मवीरांचे मुळीच समाधान झाले नाही. "तसं नाही. आधी त्याला बसवा आणि याच पंगतीत बसवा. तो बसल्याशिवाय मी मुळीच घास घेणार नाही. त्याचंही ताट वाढा आणि मगच जेवणाला सुरुवात होईल !” कर्मवीर कडाडले. संतापाने त्यांच्या आवाजाला चांगलीच धार आली होती. कर्मवीरांनी एकेकाळी सज्जनगड येथे व औदुंबर येथे तीर्थस्थानी होणाऱ्या पंक्तिप्रपंचावर आगपाखड केली होती; ब्राह्मणांना आणि ब्राह्मणेतरांना एकाच वेळी आणि एकाच जागी प्रसादाचे जेवण वाढले पाहिजे हा त्यांचा तेव्हा आग्रह होता. त्या वेळचा पंक्तिप्रपंच जातिभेदावर आधारलेला होता. तो चुकीचा होता. आणि आताचा पंक्तिप्रपंच हा वर्गभेदावर किंवा सामाजिक प्रतिष्ठेतील (स्टेटसमधील) भेदावर आधारलेला होता आणि तोही तेवढाच चुकीचा होता. आता टाकळीभानमध्येही उद्भवला आपल्याच पंगतीला बसवण्याचा त्यांचा आग्रह त्याच समानतेच्या भूमिकेतून होता. कर्मवीरांचा तो अनपेक्षित रुद्रावतार पाहून स्थानिक यजमान पुरते गांगरून अजुनी चालतोची वाट... ३२८