पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेबांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. चंद्रभानशेटजी जेवढे श्रीमंत होते तेवढेच फटकळही होते. एखाद्याचे बोलणे खटकले तर ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत; तसेच आपल्याला न पटणाऱ्या बाबींसाठी एक तांबडा पैसाही द्यायची त्यांची तयारी नसे. पण किती सहजगत्या कर्मवीरांनी त्यांच्याकडून इंजिन मिळवले होते! आणि किती अधिकारवाणीने! अर्थात हा अधिकार कर्मवीरांनी आपल्या आयुष्यभराच्या निरलस सेवेतूनच मिळवला होता. भविष्यातही रयतसाठी चंद्रभानशेटजींकडून मोठमोठ्या देणग्या मिळाल्या. रावसाहे त्या सर्वांनाच साक्षीदार होते. टाकळीभान गावाला कर्मवीरांबरोबर दिलेली भेटही रावसाहेबांच्या चांगलीच स्मरणात आहे. तिथल्या गावकऱ्यांना शाळा सुरू करायची होती. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी गावकऱ्यांनी कर्मवीरांबरोबर एक बैठक आयोजित केली होती. शाळेसाठी इमारत कशी बांधायची, त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा याची चिंता गावकऱ्यांना लागली होती. कर्मवीरच त्यासाठी कुठूनतरी देणगी उभारतील ही अपेक्षाही कदाचित त्यांच्या मनात असेल. कर्मवीरांना ती जाणवलीही असावी. इमारतीचा फार बाऊ न करता गावात उपलब्ध असेल त्या साधनसामग्रीचा वापर करूनच गावकऱ्यांनी हा प्रश्न सोडवावा असा त्यांनी विचार केला. ते म्हणाले, "अरे, पाचटाचे आणि शेवऱ्यांचे ढीग आहेत ना तुमचे ? ते वापरा, म्हणजे झाली शाळा उभी! त्याला काय लागतं!" कर्मवीरांनी गावकऱ्यांची समस्या एकदम सोपी करून टाकली. या भागात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात असायचे. त्या पिकाचे पाचट (वाळलेला पाला) ढीगच्या ढीग निघायचे. उसाच्या पिकाभोवती शेवया लावलेल्या असत; त्यांनाही तोटा नसे. गुळाला मंदी ल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असत. त्यामुळे शाळेसाठी रोख पैशांच्या स्वरूपात गावातून निधी उभारणे अवघड असे; पण बांधकामासाठी उपयुक्त अशी साधनसामग्री गावातच उपलब्ध असे व तिचा आपल्या श्रमदानात वापर करून शाळेसाठी इमारत बांधणे शक्य असायचे. आणि पुढे टाकळीभानच्या गावकऱ्यांनी त्याच मार्गाने शाळा उभारली. रवीन्द्रनाथ टागोर शांतिनिकेतनमध्ये उघड्यावर झाडाखाली शाळा भरवत हे उदाहरण कर्मवीरांच्या तोंडी नेहमी असे. चीनमध्ये माओ त्से तुंगने चालवलेल्या लोकशिक्षणाच्या चळवळीनेही त्यावेळी कर्मवीरांना पुरते भारावून टाकले होते. स्वतः कर्मवीरांनी कधीच विदेशप्रवास केला नव्हता, त्यांचे वाचनही वृत्तपत्रे सोडली तर जवळपास काहीच नव्हते. पण मागच्या काही दिवसांत चीनमध्ये होत कर्मवीरांच्या वाटेने ...