पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जवळजवळ कुठल्याच कारखान्याच्या प्रवर्तकांना मान्य नव्हती; त्यांच्या मते सहकारी साखर कारखाना हा त्या परिसरातील एकूण परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनायला हवा होता. त्यामुळेच शाळा सुरू करायला, त्यासाठी अर्थसाहाय्य पुरवायला हे कारखाने आनंदाने तयार झाले. पण हा नंतरचा भाग झाला. १९५१-५२नंतरची दहा-बारा वर्षे ही राज्यभर माध्यमिक शाळांचे जाळे उभारणारी ठरली. शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने हे महत्त्वाचे होते. त्यामुळेच आर्थिक समृद्धीच्या जोडीने शिक्षणाचेही महत्त्व बहुजनसमाजाला पटत गेले; खेड्यापाड्यांतून लक्ष्मीबरोबरच सरस्वतीचाही वावर सुरू झाला. कर्मवीरांसोबत फिरताना आलेले काही अनुभव रावसाहेबांच्या स्मरणात अगदी कोरले गेले आहेत. त्यातला एक प्रसंग आहे श्रीरामपूरचे प्रसिद्ध बागाईतदार आणि बड़े व्यापारी चंद्रभान रूपचंद डाकले यांच्याकडे जाण्याचा. वडाळा महादेवाच्या देवस्थानाची सुमारे दीडशे एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला खंडाने कसण्यासाठी म्हणून दिली गेली होती. तिथे विहीर होती, पण पाण्याचा उपसा करण्यासाठी इंजिनची गरज होती. त्यासाठी काही मदत मिळते का ते पाहावे, म्हणून कर्मवीर एक दिवस सकाळी न्याहारी उरकताच रावसाहेबांना बरोबर घेऊन शेटजींच्या पेढीवर गेले. ही घटना १९५४ सालची आहे. रावसाहेब लिहितात : "या, या, अण्णा या!” शेटजी कर्मवीरांचे विनम्रभावे लीन होऊन स्वागत करीत म्हणाले. ते त्यांच्या पेढीपुढच्या ओट्यावर उभे होते. अण्णा व मी खालीच शेटजींच्या पेढीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत उभे होतो. "इंजिनाविषयी बोलणं झाल्यावर मग तुमचं स्वागत स्वीकारतो!" अण्णा म्हणाले. "जशी तुमची आज्ञा !" शेटजी उत्तरले. "शेटजी! हे इंजिन माझंच आहे! ते मी घेऊन जाणार आहे!" अण्णा. 'अण्णा! सगळं काही तुमचंच आहे. तसंच हे इंजिनही! पण सध्या दुरुस्तीसाठी मी ते शेतीवरून आणले आहे. आपण आज्ञा करावी," शेटजी उत्तरले. " - "मग ते दुरुस्त करून द्या. मला ते वडाळा महादेव येथील आपल्या शाळेच्या शेतीसाठी पाहिजे आहे! आणि अरे हो ! मी ते नेणार कसं? तुमच्या ट्रॅक्टरमध्ये घालून तुम्हीच ते वडाळा महादेव येथील शेतीवर पोहोचतं करा!" अण्णा बोलले. " तुमच्या सूचनेप्रमाणे सर्व काही करतो अण्णा! आपण आता आत या !” शेटजींनी अण्णांना विनवले. (भावलेली माणसं, पृष्ठ ७७) अजुनी चालतोची वाट... ३२६