पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महत्त्वाचे कारण आहे. याची सुरुवात प्रवरानगरपासून झाली. डॉ. धनंजयराव गाडगीळ प्रवरा कारखान्याचे प्रवर्तक - चेअरमन होते व रयत शिक्षण संस्थेचेही ते उपाध्यक्ष होते. तो एक सामाईक दुवा होता. प्रवरा कारखान्याचे एक संचालक व अण्णाभाऊंचे मित्र आबा धुमाळ हे मूळ सातारा जिल्ह्यातले. तोही एक दुवा होता. त्यांच्याच पुढाकारातून कर्मवीर प्रवरा भागात प्रथम आले. 'प्रवरानगरचे शिल्पकार' असे ज्यांना म्हणता येईल त्या विठ्ठलराव विखे पाटील यांनाही रयतच्या कामात आस्था होती. कारखान्यासाठी ऊस पुरवणा-या शेतकऱ्यांच्या एका सभेला कर्मवीर हजर होते. त्या सभेत बोलताना कर्मवीर म्हणाले होते : "आपण सहकारी तत्त्वावर कारखाना काढून या परिसरातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहात, ही बाब अत्यंत स्तुत्य आहे. परंतु ही जनता सधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाबाळांना योग्य शिक्षण दिले नाही तर ही मुले चैनी व व्यसनी बनतील. तेव्हा यांच्या मुलाबाळांना योग्य शिक्षण दिले पाहिजे. म्हणजे या कारखान्यासाठी नोकर, तंत्रज्ञ इत्यादी या भागातूनच तयार होतील. यासाठी मी येथे हायस्कूल सुरू करणार आहे. त्यासाठी सर्व ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी थोडी थोडी झीज सोसावी. या कारखान्यात ज्यांचा ऊस येईल, त्या प्रत्येक टन उसापाठीमागे २५ पैसे शिक्षण फंड त्यांनी स्वेच्छेने द्यावा!" ही योजना नंतर कारखान्याच्या सर्वसामान्य सभेत डॉ. गाडगीळ यांनी मांडली व ती ताबडतोब मान्य झाली. यानंतर कर्मवीर त्या परिसरात वरचेवर येऊ लागले. बहुतेकदा त्यांचा मुक्काम अण्णाभाऊंच्या घरीच असे. त्याकाळी रावसाहेबही त्याच घरात राहत असल्याने एखाद्या स्वयंसेवकाने वरिष्ठ नेत्याची घ्यावी तशी रावसाहेब त्यांची काळजी घेत. त्यांचे जेवणखाण, त्यांना काय हवे - नको ते पाहत; बहुतेक वेळा प्रवासातही त्यांची सोबत करत. अशाप्रकारे १९५१- ५२पासूनच रावसाहेब कर्मवीरांच्या निकटच्या संपर्कात यायला सुरुवात झाली. इथे दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. एक म्हणजे, १९४९नंतर प्राथमिक शिक्षण द्यायची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली होती; कर्मवीरांनी सुरू केलेल्या प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व 'व्हॉलंटरी' शाळा आता सरकारी शाळा बनल्या होत्या; त्यामुळे त्या प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात बिनसरकारी शाळा उघडायला आता फारसा वाव उरला नव्हता; आजही रयतच्या एकूण शाळांमध्ये प्राथमिक शाळांची संख्या साधारण पाच टक्केच आहे. नव्याने सुरू होत असलेल्या या सर्व शाळा माध्यमिक शाळा ( हायस्कूल) होत्या. दुसरा मुद्दा म्हणजे, सहकारी साखर कारखाना हा केवळ आर्थिक निकष डोळ्यांपुढे ठेवून चालवावा ही डॉ. गाडगीळांसारख्यांची विशुद्ध अर्थवादी भूमिका कर्मवीरांच्या वाटेने ... ३२५