पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काहीच माहिती नसते. रावसाहेब शिंदे यांनी मात्र आपल्या आयुष्याची बरीचशी वाटचाल कर्मवीरांच्या वाटेने केली आहे व गेली सहा वर्षे तर ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमनही आहेत. रावसाहेब आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रथम भेट १९५१-५२ साली श्रीरामपूर येथे अण्णासाहेब शिंदे यांच्या घरी झाली. कर्मवीर तेव्हा ६५ वर्षांचे होते तर रावसाहेब २४ वर्षांचे होते. कर्मवीरांच्या कारकीर्दीचा तो सुवर्णकाळ होता, तर रावसाहेब तीन वर्षांचा अज्ञातवास संपवून नुकतेच पुण्याच्या लॉ कॉलेजात दाखल झाले होते. पण दोघांमधले हे बाह्य अंतर बाजूला सारत त्यांचे अंतरीचे धागे प्रथम भेटीतच जुळले. कर्मवीरांचा विशाल देह, छातीवर रुळणारी पांढरीशुभ्र दाढी, चेहऱ्याभोवतीचे त्यागाचे वलय या सगळ्यांमुळे ते काहीसे रवीन्द्रनाथ टागोरांप्रमाणेच दिसायचे. पुढल्या आठ-नऊ वर्षांत घडलेला कर्मवीरांचा सहवास हा रावसाहेबांना भारावून टाकणारा होता. 'परिसस्पर्श कर्मवीरांचा' असे त्या सहवासाबद्दल रावसाहेब म्हणतात. तसा कर्मवीरांच्या कार्याशी त्यांचा थोडाफार परिचय पूर्वीपासून होता. १९४८ साली साम्यवादी चळवळीत भूमिगत असताना रावसाहेब सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात तीन-चार दिवस राहिले होते. काही मित्रांनी त्यांची तिथे सोय केली होती. मागे पोलिसांचा ससेमिरा असल्याने तसे त्या काळात ते सतत फिरतीवरच असत; पण तेवढ्या कालावधीत वसतिगृहातील मुलांच्या स्वावलंबी जीवनशैलीशी त्यांचा परिचय झाला होता व 'कमवा आणि शिका' ही संकल्पनाही त्यांना आवडली होती. 'शिंदे बोर्डिंग' चालवायचा रावसाहेबांचा अनुभव साधारण याच प्रकारचा होता. पण त्या भूमिगत अवस्थेत कर्मवीरांशी अधिक परिचय करून घेणे शक्यच नव्हते. तो योग आला आणखी तीन-चार वर्षांनी; श्रीरामपुरात अण्णासाहेबांच्या घरी कर्मवीरांची भेट झाली तेव्हा. जवळच्या इतर मंडळींप्रमाणे रावसाहेबांनीही कर्मवीरांना 'अण्णा' म्हणायला सुरुवात केली. अर्थात घरात दुसरे एक अण्णा होतेच - वडीलबंधू अण्णासाहेब ! कर्जत या गावी कर्मवीरांनी नुकतेच महात्मा गांधी विद्यालय सुरू केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या कामाचा हा श्रीगणेशा. इथले काम वाढवायची कर्मवीरांची इच्छा होती. लवकरच ते वाढलेही; आज महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही जिल्ह्यापेक्षा अहमदनगरमधल्या रयतच्या कामाची व्याप्ती अधिक आहे. सहकारी साखर कारखान्यांनी दिलेले पाठबळ हे रयतच्या विस्तारामागचे एक अजुनी चालतोची वाट... ३२४