पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

m कर्मवीरांच्या वाटेने शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत पोचवणारी रयत शिक्षण संस्था म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक चमत्कार आहे. अंगमेहनतीची कामे करून शिक्षणासाठी चार पैसे उभे करणारे ग्रामीण विद्यार्थी, गावकऱ्यांनी शाळेसाठी उपलब्ध करून दिलेली तुटपुंजी जागा आणि केवळ पोट भरण्यापुरते वेतन घेऊन शिकवणारे तळमळीचे ध्येयवादी शिक्षक यांची सांगड घालून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली आपल्या स्वप्नातल्या रयतची मुहूर्तमेढ रोवली आणि मग अविरत परिश्रम घेऊन गावोगावी शाळांचे व वसतिगृहांचे एक मोठे जाळेच त्यांनी विणले. एकोणिसशे साठ साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ज्यांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिले असे सहकारक्षेत्रातले व राजकारणातले अनेक नेते रयतच्याच शाळांमधून तयार झाले होते, व आहेत. आज या रयतचा तिच्या बोधचिन्हाप्रमाणेच एक मोठा वटवृक्ष झाला असून ती आशिया खंडातील सर्वांत मोठ्या शिक्षणसंस्थांपैकी एक मानली जाते. संस्थेचे मुख्य कार्यालय सातारा येथे असून महाराष्ट्रातील चौदा व कर्नाटकातील एक अशा एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये संस्थेचे काम चालते. सध्या, म्हणजे २०१४ साली, संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालये वगैरेंची संख्या ६७४ आहे, विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेचार लाख, तर कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे अठरा हजार आहे. मुंबईच्या फोर्ट विभागात मुंबई विद्यापीठाच्या लगतच्याच मोठ्या रस्त्याला कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव दिलेले आहे. दुर्दैवाने आपल्या देशातील ग्रामीण आणि शहरी भागांतली दरी आणि एकूणच इतिहासाविषयीचे अज्ञान इतके प्रचंड आहे, की त्या हमरस्त्यावरून रोज जा-ये करणाऱ्या हजारो पांढरपेशा मुंबईकरांना कर्मवीर भाऊराव पाटलांची किंवा रयत शिक्षण संस्थेची जवळजवळ कर्मवीरांच्या वाटेने ... ३२३