पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थोड्याशा अंतरावर बाजूलाच बसावे लागे. शाळा सुटल्यावरही तालासुरात 'परवचा' म्हणायचा रिवाज होता. मुलांच्या आवाजाने गाव दणाणून जाई. दररोज संध्याकाळी पारावर किंवा देवळाच्या ओसरीवर एकत्र जमून मोठमोठ्याने असे पाढे तसेच कविता म्हणायचा प्रघात होता. त्यामुळे पाढे, कविता चांगल्या तोंडपाठ होऊन जायच्या. काही गैरवर्तन घडले, तर मास्तर चांगले बदडून काढत. हातावर सपासप छडी मारणे ही तर नेहमीची रूढ शिक्षा. 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' अशी म्हणही प्रचारात असायची. पण मुलांचे आई- बाप अशा शिक्षेबद्दल मुळीच तक्रार करत नसत. उलट मास्तरांच्या मारण्यामुळे मुलगा शहाणा होणार अशीच समजूत असायची. त्याकाळी दप्तराचे ओझे असे नसायचे; एका फडक्यात बांधलेली पाटी आणि दोन- - चार पुस्तके एवढीच काय ती शिक्षणसाधने. पुढे रावसाहेब दुसरीत गेल्यावर कित्ता आणि बोरू आला. त्याकाळी ग्रामीण शाळांमध्ये मोडी लिपी प्रचलित होती. बोरू शाईत बुडवून अक्षरे गिरवावी लागत. हाताला त्यामुळे चांगले वळण लागे. वरच्या वर्गात तालुक्यातील नद्या, त्यांच्याकाठची गावे असे धडे असायचे. ते धडेही गाण्यासारखे एखाद्या लयीत म्हणायची पद्धत होती व त्यामुळे धड्यातली माहितीही मुखोद्गत होई. मुद्रणाचा शोध लागण्यापूर्वी पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरेचा हा एक चांगला परिणाम होता. हिशेष, गणित असेही विषय असायचे. मास्तरांनी वर्गात प्रश्न विचारला, की ताबडतोब उत्तर देता आले पाहिजे असा दंडक होता. शाळा सुटल्यानंतर मात्र फक्त खेळणे व्हायचे. गृहपाठ हा प्रकारच नसायचा. आई-वडील निरक्षर असल्याने त्यांनी घरी मुलांचा अभ्यास घेणे हाही प्रकार नसायचा. शाळेत मात्र शिक्षक अगदी मन लावून शिकवत. रेतर शिक्षकांचा पगार तेव्हा अगदी कमी असायचा. शाळेतले श्रीधरमास्तर सेवानिवृत्त झाले तेव्हाचा त्यांचा मासिक पगार फक्त अठरा रुपये होता. वर्गात रावसाहेबांचा कायम पहिला नंबर असायचा. रावसाहेबांच्या चिंतनात, भाषणांत अलीकडे शाळेतले ते दिवस खूपदा डोकावतात. ते म्हणतात, "शाळा करूनही आम्ही मुलं शेतात, रानात, नदीनाल्यात, डोंगरात हुंदडायचो. मनसोक्त खेळायचो. गप्पागोष्टींत रमायचो. शेतमळ्यात आई-बापाबरोबर जमेल ते काम करायचो. बाजारला, जत्रांना जायचो. पाहुण्यारावण्यांच्या घरी जायचो आणि मजा करायचो. आमच्या शाळेच्या अभ्यासात यामुळे कसलाही व्यत्यय येत नव्हता. विशेष म्हणजे आम्ही मुलं गरिबीतही आनंदात असायचो. मग आजचे हे पाडळीतल्या पाऊलखुणा... ३१