पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वडलांनी दिलेले पाठबळ केवळ अविस्मरणीय असेच होते. त्या म्हणतात, "मी साधी दोन पावले जरी नीटपणाने टाकली किंवा डॉक्टरांनी सांगितलेला एखादा व्यायाम चांगल्याप्रकारे केला, तर ज्या पद्धतीने पप्पा कौतुक करायचे, टाळ्या वाजवायचे, ते मी विसरूच शकत नाही." रावसाहेबांच्या मुलांशी बोलताना आपल्याला जाणवते, की आठवणींची अशी अनेक पिसे त्यांनी मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी अगदी जपून ठेवली आहेत. 'Character is caught, never taught' ('चारित्र्य शिकवून येत नाही, प्रत्यक्ष संपर्कातूनच ते आत्मसात करता येते') असे म्हणतात. मुलेही शिकतात ते आईवडलांनी शिकवल्यामुळे नव्हे, तर आईवडलांचे वागणे प्रत्यक्ष पाहूनच. संस्कारधन म्हणतात ते हेच असावे. वकिली ऐन भरात असतानासुद्धा आणि सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णवेळ झोकून दिल्यानंतरच्या काळातही रावसाहेबांनी आपल्या मुलांसाठी, नातवंडांसाठी नेहमीच पुरेसा वेळ काढला व त्याचे खूप मोठे फळही नियतीने त्यांच्या झोळीत टाकले. आजही नातवंडे आजारी असली, की रावसाहेब अस्वस्थ येरझारा घालत राहतात, सतत त्यांच्या तब्येतीची व औषधपाण्याची काळजी करत राहतात. या बाबतीत ते खूपच हळवे आहेत. कुटुंबीयांबरोबरच्या गप्पागोष्टींत, थट्टामस्करीत रमलेले रावसाहेब व शशिकलाताई पाहणे हा एक लोभस अनुभव आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे आणि उद्याच्या युगात ही स्पर्धा अधिकच तीव्र होत जाणार आहे. या स्पर्धायुगाचे काही फायदे नक्कीच आहेत, पण यात एक मोठी भीतीही आहे. ती म्हणजे जे लोक स्पर्धेसाठी सक्षम नाहीत, ते एकदम मैदानाच्या बाहेरच फेकले जातात; त्यांना कोणीच वाली उरत नाही. 'अमंत्रम् अक्षरम् नास्ति, नास्ति मूलम् अनौषधम्, अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकः तत्र दुर्लभ:' हे सुभाषित आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असते, पण प्रत्येक व्यक्तीचा योग्य तो उपयोग करून घेणारे ते योजक खूप दुर्लभ असतात. अनेकांवर मग 'फुकट गेलेले' असा शिक्का बसतो - कारखान्यातील 'रिजेक्टेड' मालाप्रमाणे. जागतिकीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या या जमान्यात अशांची संख्या प्रचंड आहे. त्यातून एक दुभंगलेला समाज आपल्या अवतीभवती निर्माण होतो आहे. भोवतालच्या समाजाविषयी अंतरीचा आपलेपणा असणारी आणि विशेष म्हणजे त्यानुसार साध्यासुध्या दैनंदिन कृती सातत्याने करत राहणारी शशिकलाताईंसारखी व एकूणच शिंदे कुटुंबीयांसारखी मंडळी ही म्हणूनच काळाची गरज आहे. जीवसृष्टीच्या विकासासाठी ज्याप्रमाणे ऊब लागते, ओलावा लागतो, त्याप्रमाणे हा दुभंगत चालणारा समाज थोडाफार तरी सांधला जावा यासाठीही एक आपलेपणाचा अजुनी चालतोची वाट... ३१८