पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ओलावा लागतो, करुणेची ऊब लागते. शिंदेंसारखी कुटुंबे म्हणजे ही ऊष, हा ओलावा पुरणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. विनोबांनी संस्कृतीची एक सुरेख व्याख्या केली आहे. "माझी भाकरी मी खाणे आणि तुझी तू खाणे ही प्रकृती. माझी भाकरी मी खाणे आणि तुझीही भाकरी हिसकावून खाणे ही विकृती आणि माझी अर्धी भाकरी तुझी भूक जास्त आहे, म्हणून मी तुला देणे ही संस्कृती." या व्याख्येत अभिप्रेत असलेल्या संस्कृतीपर्यंत मानवाचे उन्नयन व्हायचे असेल, तर अशा कुटुंबांची संख्या खूप खूप वाढायला हवी. आपल्या पत्नीविषयी स्वत: रावसाहेबांना मनापासून कृतज्ञता वाटते आणि आज आपण जे कोणी आहोत त्याचे सर्वाधिक श्रेय ते मोकळ्या मनाने तिलाच देतात. रावसाहेब लिहितात : "माझी तिने आयुष्यभर खूपच काळजी घेतली. कोर्टाचा ड्रेस करताना मला टाय बांधता येत नसे. तोही ती बांधून द्यायची. तीच गोष्ट बुटाच्या लेसबाबत. माझ्या अनेक वेळच्या गंभीर आजारांत ती माझी एका प्रकारची डॉक्टरच झाली. डॉक्टर पै तर औषधांच्या संबंधीच्या सूचना देताना मला स्पष्टच म्हणायचे, 'थांबा, थांबा. तुम्हांला हे काही सांगून उपयोग नाही. मी या सगळ्या सूचना वहिनीसाहेबांना देतो.' या वयातही मी इतका कार्यरत राहू शकतो, याचे फार मोठे श्रेय शशीलाच आहे. आमच्या घराला तिने घरपण दिले. " पत्नीच्या सफाईदार ड्रायव्हिंगच्या संदर्भात "मी साधा बैलगाडी चालवणारा, ' असेही रावसाहेब प्रांजळपणे लिहितात. " आता आयुष्याच्या सांजपर्वात रावसाहेबांना शशिकलाताईंविषयी वाटणारी ही कृतज्ञता अधिकच गहिरी झाली आहे. देणे भगवंताचे या गौरवग्रंथातील आपल्या लेखाचा शेवट करताना भावव्याकूळ होऊन रावसाहेब लिहितात : "शशीने आमच्या नंतरच्या काही वर्षांनंतर एक मंगळसूत्र सोडल्या अंगावर कधीही कोणताही दागिना घातला नाही, भारी वस्त्रे परिधान केली नाहीत. कोणत्याही महागड्या गोष्टीकडे आपली दृष्टी कधी वळू दिली नाही. पैशाचाही मोह तिच्या मनात कधीही उद्भवला नाही. साधेपणातच तिने सौंदर्य जोपासले. स्नो, पावडरनेदेखील ती कधी नटलीथटली नाही. मलाच काय, जवळच्या सगळ्यांना तिच्या साधेपणातील सौंदर्याचे आणि आनंदाचे आश्चर्यच वाटते. शशीबद्दल मी किती लिहू आणि काय लिहू? माझे तिच्याबद्दलचे लिखाण हे कधीच संपणारे नाही. मी तिच्याकडे मागू तरी काय ? कारण मी न मागताही ती सर्व काही देतच राहिली आहे. आम्हां सर्वांवर ती प्रेम, जिव्हाळा यांचा सततच वर्षाव करीत राहिली आहे. आमच्यासाठी ती चंदनासारखी झिजतच राहिली आहे. शशिकलाताई : हे देणे भगवंताचे ... ३१९