पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूनबाई डॉ. प्रेरणा काहीशा विनोदाने म्हणाल्या असल्या, तरी त्यात पुष्कळ तथ्य आहे. स्वत:ला पुरोगामी विचारवंत म्हणवणारी कितीतरी मंडळी घरच्या मोलकरणींचा पगार वाढवून द्यायला मात्र सहसा राजी होत नाहीत किंवा बाहेर समानतेचा नारा देत असताना अवतीभवतीच्या नोकरचाकरांशी वागताना मात्र किमान माणुसकीही दाखवत नाहीत; त्यांना आपल्यातलेच जेवायला देणे तर दूरच राहिले. शिंदे कुटुंबात मात्र घरात केलेला प्रत्येक पदार्थ नोकरांनाही दिला जातो. त्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी राहीबाई अगदी गरीब घरातली. झोपडपट्टीत राहणारी. नवरा दारुड्या आणि बाई ठेवलेला. बायकोला मारहाण करणारा. शशिकलाताईंनी तिला सतत आधार दिला. "रोज एक मोठा ग्लास भरून इथलं दूध पीत जा; मला विचारायचीसुद्धा काही गरज नाही," अशी राहीबाईला कायमसाठी मुभा असे. विक्रमबाबांची हकीकतही खूप वेधक आहे. शिंदे कुटुंबातले हे जुने इमानी नोकर. पुढे खूप म्हातारे झाले, हातून काम होईना. त्यांना निवृत्त केले गेले. पण त्यांचा पूर्ण पगार ते जिवंत असेस्तोवर त्यांना घरपोच मिळेल, अशी व्यवस्था डॉ. राजीव यांनी आनंदाने व स्वत:च्याच पुढाकाराने केली. दुर्दैवाने पुढे त्यांच्या घरची माणसेच त्यांची खूप आबाळ करू लागली. हे कानावर येताच राजीवनी त्या मंडळींना आपल्या रुग्णालयात बोलावून घेतले. भरपूर दम दिला. शेवटी ते म्हणाले, "त्यांचे हाल होत आहेत, असं एका शब्दानेही पुन्हा कधी माझ्या कानावर आलं तर याद राखा. तुमच्याच्याने होत नसेल, तर त्यांना इथे आमच्या घरी आणून सोडा. आम्ही त्यांना एक खोली देऊ आणि मरेस्तोवर सांभाळू." यानंतर त्यांच्या घरची माणसे सरळ झाली. आपल्या नोकरांची अशी जबाबदारी घेणे हे आपल्याला आज किती कुटुंबांत दिसेल ? रावसाहेबांच्या ७५व्या वाढदिवशी, १० जून रोजी आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात शिंदे कुटुंबीयांनी आपल्याकडे किंवा आपल्यासाठी काम करणाऱ्या एकूण २९ जणांचा शाल-श्रीफळ देऊन, तसेच पुरुषांना शर्टपीस-पँटपीस व महिलांना साडी देऊन, महादेव मळ्यात जाहीर सत्कारही केला होता. त्यांच्यासाठी खास जेवणही ठेवले. त्यात त्यांचा धोबी, न्हावी, मोची, शिंपी, स्वैपाकी, घरगडी, शेतातले गडी वगैरेंचाही समावेश होता. शारीरिक श्रम करणाऱ्यांना आपल्या देशातील पारंपरिक जातिव्यवस्थेने नेहमीच हीन लेखले. त्या पार्श्वभूमीवर श्रमिकांचा हा गौरव विशेष लक्षणीय वाटतो. आपल्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा हा सत्कार पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू व विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते व भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे परिवाराने अजुनी चालतोची वाट... ३१४