पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपले बनून जातात. रावसाहेब आणि शशिकलाताई यांनी केलेले हे विविध संस्कार त्यांच्या मुलांनी-नातवंडांनी आत्मसात केले, हेही विशेष. यात थोडासा भाग्याचाही भाग असावा. कारण कधीकधी असेही होते, की वडीलधारी माणसे कितीही चांगले संस्कार करणारी असली, तरी पुढची पिढी ते करून घ्यायला तयार नसते. त्या दृष्टीने शिंदे पती-पत्नी भाग्यवानच म्हणायला हवेत. त्यांची मुले आणि नातवंडे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या वेलीवरची संस्कारफुले आहेत. कुटुंबप्रेमानंतर आतिथ्यशीलता हे शशिकलाताईंचे मला जाणवलेले दुसरे वैशिष्ट्य. 'अतिथि देवो भव' असे आपली संस्कृती शिकवते खरी, पण किती भारतीय घरांमधून आज या आतिथ्यधर्माचे पालन केले जाते? पाहुणे येणार, आणि तेही राहायला, म्हटल्यावर कपाळाला आठी पडणाऱ्यांचेच प्रमाण अधिक! महादेव मळ्यात मात्र पाहुण्यांचा राबता अखंड. त्यात अनेक नामवंत साहित्यिकांचा, कलावंतांचाही समावेश असतो. या घरात कोणीही मद्यपान करीत नाही किंवा कोणाला मद्य दिलेही जात नाही, हे यासंदर्भात मुद्दाम नमूद करावेसे वाटते ! यशवंतराव चव्हाणांपासून पु. ल. देशपांडेपर्यंत अनेक मान्यवर महादेव मळ्यात वास्तव्य करून गेले आहेत व त्या सर्वांनीच शिंदे परिवाराच्या आतिथ्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. ग. दि. माडगूळकर एकदा त्यांच्याकडे दहा दिवस राहिले होते. आपल्या १२ जानेवारी १९७७ रोजी लिहिलेल्या एका पत्रात त्या दिवसांमधील अनेक सुखद आठवणींचा गदिमांनी उल्लेख केला आहे. "पुन्हा योग येईल तेव्हा येवो; तोवर या आठवणी बकुळीच्या फुलांसारख्या मनाच्या कपाटात दरवळत राहतील, " असे ते लिहितात. गदिमांनी लिहिले होते, "आम्ही साहित्यिक माणसांच्या मुद्रा टिपतो. सौ. शशीवहिनींसारखी गृहिणी तुम्हांला लाभावी, देणे भगवंताचे.” आपल्या सुरेख हस्ताक्षरात गदिमांनी लिहिलेल्या त्या पत्राचा आजही रावसाहेबांना सार्थ अभिमान वाटतो. तर अर्थात या कुटुंबातली आतिथ्यशीलता ही फक्त बड्या, खास व्हीआयपींसाठी नसते. व्हीआयपींचे आदरातिथ्य लोक उत्तमच करतात, त्यात विशेष असे काही नाही. पण या घरात सर्वांचेच आदरातिथ्य अगत्यपूर्वक होते. किंबहुना घरी सर्वांचे प्रेमाने स्वागत होईल याची खात्री असल्यामुळेच रावसाहेब आपल्या घरी सर्वांसाठी मुक्तद्वार ठेवू शकले. आतिथ्यशीलतेची एक आठवण. रावसाहेबांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त काही जणांना आमरसाचे जेवण द्यायचे ठरले. पण शिंदे कुटुंबाचा गोतावळा शशिकलाताई : हे देणे भगवंताचे ... ३११