पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहिल्यामुळे त्यांच्या जीवनाला कुठल्याही मर्यादा पडलेल्या नाहीत; उलट अनेक अनपेक्षित अंगांनी ते बहरून गेले आहे. राजीव तसे मितभाषी वाटतात, पण त्यांच्या वागण्यातून त्यांची आत्मीयता पाझरत राहते. तशी ही सर्वच भावंडे एकमेकांवर खूप प्रेम करणारी आहेत. शुभांगी यांचे डोक्यातील ट्यूमरचे ऑपरेशन करायचे होते व त्यासाठी त्यांचे केशवपन आवश्यक होते. अशा प्रसंगी बहिणीचे मनोबळ वाढावे म्हणून राजीवनी स्वतःचाही चक्क गोटा करून घेतला होता! बहीण-भावाचे असे प्रेम खूप दुर्मिळच म्हणायचे. या कुटुंबप्रेमाचाच एक आविष्कार म्हणजे सर्व आनंदाचे प्रसंग घरच्या सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे करणे. त्यासाठी आवश्यक तो हौशी स्वभाव हेही शशिकलाबाईंचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या एकूण रसिकतेचेच हे एक अंग आहे. त्यांची एक नात पल्लवी ( शुभांगी व बद्रीनाथ देवकर यांची कन्या) लिहिते, "I count days to my birthday. Ican, without a doubt, say that this excitement over the slightest possible occasion has been passed on to all us grandchildren by Mumma. A birthday without new clothes from Mumma was absolutely unimaginable!" 'Child-like innocence' हा तिने पुढे आजीबद्दल केलेला शब्दप्रयोगही खूप बोलका आहे - विशेषत: एक नात आपल्या आजीबद्दल हे लिहिते आहे हे लक्षात घेतले की ! - २१ मे २०१३ रोजी शशिकलाताईंनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्ताने देणे भगवंताचे हा त्यांच्यावरील एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. सुहृदांच्या आठवणींचे संकलन असे या गौरवग्रंथाचे स्वरूप आहे. यातील त्यांच्या नातवंडांच्या आठवणी मुद्दाम वाचाव्यात अशा आहेत. पल्लवीची उपरोल्लेखित आठवण ही त्यातलीच एक. आजीचा ल्युडो खेळतानाचा उत्साह, विशेष म्हणजे बागेतल्या ट्राम्पोलिनवरच्या उड्या, यांचाही उल्लेख काही नातवंडांनी केला आहे. महादेव मळ्याच्या प्रवेश - रस्त्यावर (ड्राइव्हवेवर) कोरलेल्या सर्व नातवंडांच्या नावांचेही या नातवंडांना खूप कौतुक आहे. वेळोवेळी कोरलेली अशी नावे शोधत बसणे हा नातवंडांचा आवडीचा टाइमपास. ज्यांना अशी प्रेमळ आजी लाभली ती नातवंडे भाग्यवानच म्हणायला हवीत. सख्या नातवंडांप्रमाणेच कुटुंबात नव्याने समावेश झालेल्यांवरही शशिकलाबाई तितकीच माया करतात. आपल्या नातजावयासाठी त्याला आवडणारा गुलकंद व खारी बिस्किटे मग त्या न विसरता आणत जातात. परकेही मग बघता बघता अजुनी चालतोची वाट... ३१०