पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दारू उडवायचे काम चालायचे आणि सारी जत्रा ती गंमत पाहण्यात रंगून जाई. ह्या जत्रेशी निगडित असलेली एक आठवण सांगण्यासारखी आहे. बाईंच्या गप्पांमध्ये एक-दोनदा "तुझा जन्म झाला तेव्हा घरातली सगळी मंडळी भोजापूरच्या जत्रेला गेली होती. मी एकटीच घरी होते. बाळंत व्हायच्या वेळची सगळी धावाधाव फक्त ताईने केली, " असा उल्लेख रावसाहेबांनी ऐकला होता. यात काहीतरी विसंगती आहे, असे एक दिवस रावसाहेबांना जाणवले. त्यावेळी ते साठीत होते. 'ही जत्रा गुढीपाडव्याच्या नंतरच्या दिवशी असते व तो सण साधारण मार्च-एप्रिलमध्ये येतो. म्हणजे माझा जन्मही त्याच सुमाराचा हवा. मग माझ्या जन्माची अधिकृत तारीख कागदोपत्री १० जून १९२८ अशी कशी काय ?" असा विचार त्यांच्या मनात आला. त्याकाळी समाजात, विशेषत: ग्रामीण भागात, शाळेत प्रवेश घेताना खूपदा जूनमधली जन्मतारीख घातली जाई. त्यामुळेही कदाचित अशा विसंगती अनेक ठिकाणी असत. पण रावसाहेबांनी याबाबतीत खोलात जायचे ठरवले. बरीच खटपट केल्यानंतर त्यांना सिन्नरच्या मामलेदार कार्यालयातून हवा असलेला लेखी दाखला प्राप्त झाला व त्यानुसार रावसाहेबांची खरी जन्मतारीख ५ एप्रिल १९२७ आहे हे स्पष्ट झाले. अर्थात नोंदलेली जुनी तारीख सर्व कागदपत्रांत सुधारून घ्यायचा काही प्रश्न नव्हता, कारण एव्हाना हे सगळे प्रकरण खूपच जुने झाले होते; पण आपली नेमकी जन्मतारीख काय आहे, हे यातून रावसाहेबांना कळले आणि हे घडून आले ते केवळ भोजापूरची जत्रा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच भरते या नित्यनेमामुळे आणि त्याचवेळी मुलाचा जन्म झाला होता या बाईंच्या नेमक्या आठवणीमुळे. रावसाहेबांचे प्राथमिक शिक्षण पाडळी गावातच झाले. गावातल्या एकमेव सरकारी शाळेत लहान बिगरीच्या वर्गात जून १९३२मध्ये रावसाहेबांचे नाव घातले गेले. लहान बिगरी व मोठी बिगरी (आताची ज्युनिअर व सिनिअर के.जी.) आणि पुढे पहिली ते चौथी अशी एकूण सहा वर्षे त्यांनी या शाळेत काढली. सुरुवातीला वेगवेगळे वर्ग असे नव्हतेच. गावातल्या देवळात माडीवर शाळा भरायची. शाळेत सगळी मिळून तीस एक मुले जात आणि एकच मास्तर सगळे विषय शिकवत. मुले खाली जमिनीवरच बसायची. शाळा देवळात भरायची तेव्हा दलित समाजाच्या मुलांना देवळात येता येत नसे; शाळेबाहेर पटांगणावर बसूनच त्यांना शिकावे लागे. ते दुसरीच्या वर्गात गेले तेव्हा देवळालगत चावडीची लहानशी इमारत बांधली होती तेथे शाळा भरू लागली. आता मात्र दलित समाजातील मुलांनाही शाळेत बसता येऊ लागले. पण त्यांना सवर्णांपासून अजुनी चालतोची वाट... ३०